आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इफ्फीमध्ये गाजले फिल्म हेरिटेज मिशनचे प्रदर्शन, पोस्टर्स, रिस्टोअर्ड फिल्म्सची उत्सुकता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- चित्रपट कलेचा समृद्ध भारतीय वारसा जतन-संवर्धनातून पुढील पिढ्यांसाठी राहावा, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ प्रकल्पांतर्गत सुरू झालेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रदर्शन गोव्यातील इफ्फीचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. प्रदर्शनाच्या उद््घाटनाप्रमाणेच दिवसभर शेकडो चित्रपट रसिकांची पावले या ‘मल्टिमीडिया प्रदर्शन आणि सिग्नेचर फिल्मच्या स्क्रीनिंग’कडे वळत आहेत. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. या वेळी एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा, संजय मूर्ती आदी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, मोठ्या प्रमाणात निधी गुंतवून चित्रपट जतन-संवर्धन करणारा जगातल्या मोजक्या देशांपैकी एक आपला देश आहे. संस्थेकडे या कार्यासाठी समर्पित मनुष्यबळ आहे. प्रदर्शनातून अधिक जाणीव-जागृती होईल. एनएफएआयने आजवर ३०० चित्रपट रिस्टोअर केले आहेत. ५०० चित्रपटांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. इफ्फीतील प्रदर्शनात ८० पोस्टर्स आणि २५ दृकश्राव्य सादरीकरणे आहेत, असे एनएफआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.
उद‌्घाटन करताना राज्यवर्धन राठोड.

"गुळाचा गणपती'चे हस्तलिखित मिळाले
नॅशनलफिल्म हेरिटेज मिशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘सबकुछ पुल’ असणाऱ्या ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाची पुलंची संहिता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाली आहे. १९५३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. निर्माते विनायक राजगुरू यांच्या पत्नी सरोजिनी राजगुरू यांनी पुलंच्या हस्ताक्षरातील ही संहिता फिल्म हेरिटेज मिशनकडे सुपूर्द केली. ९० पृष्ठांची ही संहिता १९५१ मध्ये लिहिली आहे. या संहितेचे डिजिटल स्कॅनिंग करूनही जतन केले जाईल, असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

काय आहे एनएफएचएम?
नॅशनलफिल्म हेरिटेज मिशन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी तब्बल ५९७.४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. चित्रपटांचे जतन, संवर्धन, डिजिटायझेशन आणि रिस्टोरेशन या चार प्रमुख उद्दिष्टांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.

सिग्नेचरफिल्म
नॅशनलफिल्म हेरिटेज मिशनच्या प्रसारासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने छोटी सिग्नेचर फिल्म बनवली आहे. तीन मिनिटांची ही फिल्म ‘सिनेमा इज इम्मॉर्टल..ओन्ली इफ इट इज प्रिझर्व्हड’ या संकल्पनेवर आधारली आहे.अजित वाडीकर यांचे दिग्दर्शन तर स्वप्निल सोज्वळ यांचे लेखन आहे.