आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधीर मोघे यांचे पुण्यात निधन; विसावला खेळ सावल्यांचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कवितेच्या पानापानांतून संवेदनशील मनांना साद घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, संगीतकार, चित्रकार सुधीर राम मोघे (वय 75) यांचे शनिवारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शुभदा, बंधू श्रीकांत मोघे असा परिवार आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीड महिन्यापासून मोघे अर्धांगवायूवर खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यातच शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कवी सुधीर मोघे, ही ओळख प्रिय असणार्‍या मोघे यांनी कलाक्षेत्रातील अनेक दालनांत मुक्त संचार केला आणि आपली गुणवत्तापूर्व ओळख निर्माण केली. कविता पानोपानी, स्मरणयात्रा, नक्षत्रांचे देणे, उत्तररात्र - रॉय किणीकर, मंतरलेल्या चैत्रबनात आदी रंगमंचीय प्रयोग तसेच पुलंवरील ‘या सम’ हा लघुपट त्यांनी गाजवले.

काही अजरामर गाणी
०फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
०सखी मंद झाल्या तारका ०संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
०आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई
०आला आला वारा संगे पावसाच्या धारा
०गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
० भले बुरे जे घडून गेले
०तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
०सांज ये गोकुळी, सावळी सावळी
०विसरू नको, श्रीरामा, मला
०भेटशील केव्हा माझिया जिवलगा... इत्यादी.