पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील उद्या होणा-या जाहीर सभेला अखेर एसपी कॉलेजचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील 'दादा' मंत्र्याने याबाबत हस्तक्षेप करून हे मैदान उपलब्ध करून देण्यास मदत केली आहे. त्यामुळे मनसेचा 'राज'हट्ट अखेर पुरा झाला असून, राज ठाकरे एसपीतील मैदानावरून 'दुनियादारी' करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे पोलिसांनी डेक्कन पुलाखालील नदीपात्रात परवानगी दिल्यानंतरही मनसे एसपी कॉलेजच्या मोकळ्या प्रांगणासाठीच अडून बसली होती. नदीपात्रात लोक बसणार नाहीत, असे गणित मांडून नदीपात्रात सभा घेण्यास मनसे तयार नव्हती. त्यांचे म्हणणेही एका अर्थाने खरेच होते. कारण तेथे अस्वच्छता आहे. पण शिक्षण प्रसारक मंडळाच्या एसपी कॉलेजने एकाही राजकीय पक्षाच्या सभांना मैदानावर सभा घेण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे पुण्यातील मनसे पदाधिका-यांना काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. अखेर काल सायंकाळी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. त्यांनी नदीपात्रातील सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तेथे सभा घेण्यास नापसंती दिली.
राज ठाकरेंनी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलविली. एसपीचे लोक मैदान देत कसे नाहीत, त्याचे काय दूध निघते की काय असा खोचक सवाल उपस्थित केला. त्यानंतर पुण्यातील दादा म्हणणा-या एका मंत्र्याने एसपीतील मंडळीशी संपर्क साधून मैदान उपलब्ध करून देण्यास विनंती केली. त्यानंतर एसपीची मंडळी तयार झाली. मात्र सभेदरम्यान 'धांगडधिंगा' होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना मनसेला दिली आहे. मनसेने आपल्या पदाधिका-यांना लगेच निरोप धाडला असून एसपीत कोणत्याही स्वरुपात 'दुनियादारी' होणार नाही याची खबरदारी घेऊ असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंची तोफ उद्याच्या सभेत कोणा-कोणावर धडाडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. टोल धोरणावर आपण 9 तारखेच्या सभेत तमाशा करू असे सांगून राज यांनी उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे त्यांच्या तोफेच्या तोंडी कोण-कोण येते याकडे लक्ष लागले आहे.
पुढे वाचा, राज ठाकरेंच्या मॅनेजमेंट आणि दादा मंत्र्यांचा हस्तक्षेप...