आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 रुपये पगाराची केली नोकरी, अाज 10 हजार काेटींची उलाढाल, वाचा Finolex ची सक्सेसस्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फिनोलेक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रल्हाद छाब्रिया यांचे काल निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. 1930 मध्ये त्यांचा जन्म कराचीत झाला होता. वडिलांच्या निधनानंतर ते पुण्यात आले होते. त्यांचे वडील मोठे कापड व्यापारी होते. पण त्यांच्या निधनानंतर छाब्रिया कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी पुण्यात यावे लागले. तरीही प्रल्हाद यांनी फिनोलेक्सची स्थापना करुन पुन्हा आर्थिक भरभराट घडवून दाखवली.
‘फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावानी,’ ही ऐंशी-नव्वदच्या दशकात रेडिओवरची जिंगल न ऐकलेला माणूस क्वचितच सापडायचा. आजमितीस १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या फिनोलेक्स उद्योगसमूहाला जन्म देणारे प्रल्हाद छाब्रिया दुसरीनंतर शाळेतही जाऊ शकले नव्हते. पाच कंपन्या, पुणे, रत्नागिरी, गोवा, उत्तराखंड येथे ११ कारखाने असा पसारा व केबल्सच्या उत्पादनात क्रमांक एकवर असलेल्या फिनोलेक्सचे जन्मदाते प्रल्हादजी कधीकाळी महिना दहा रुपयांची नोकरी करत होते, हे सांगून खरे वाटणार नाही.

फिनोलेक्सचे संस्थापक प्रल्हाद परशराम छाब्रिया मूळचे पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातले. त्यांचे वडील परशराम कराचीमधले प्रसिद्ध कापड व्यापारी. मात्र, परशराम यांचे १९४२ मध्ये अचानक निधन झाले. त्यामुळे पत्नी, पाच मुली आणि पाच मुले असा मोठा परिवार उघड्यावर आला. वडील वारल्यानंतर बारावर्षीय प्रल्हादने साफसफाईची दहा रुपये पगाराची नोकरी मिळवली.
लिहिता-वाचता येत नसल्याने दुसरे काम मिळणे शक्य नव्हते. पुण्यात एक लांबचा नातेवाईक होता. तेवढा धागा धरून पंधराव्या वर्षी प्रल्हाद आणि त्यांचा धाकटा भाऊ किशन यांनी १९४५ मध्ये पुणे गाठले. चाैदा- चाैदा तास काम केले. कराचीत विधवा आईला ते दरमहा तीस रुपये पाठवायचे. १९४७ च्या सुमारास फाळणीच्या झळा बसू लागल्याने छाब्रियांच्या कुटुंबाने पुण्यात स्थलांतर केले.
त्या काळी ‘रेफ्युजीं’ना राहण्यासाठी कोणी जागा देत नसे. नारायण पेठेत दोन खणांची भाड्याची जागा कशीबशी मिळाली. छाब्रियांनी मुंबईतून हजार-दोन हजारांचे कापड आणून ते लक्ष्मी रस्त्यावर विकण्यास सुरुवात केली. पण दिवसाला पाच-दहा रुपयेच मिळायचे. दोन महिन्यांतच त्यांनी हा धंदा गुंडाळला. पुढे मुंबईतून विजेची उपकरणे आणून विकण्याचा धंदा सुरू केला. सरकारी कामांच्या निविदा भरण्यास सुरुवात केली.
पुढील स्लाईडवर वाचा.....
- दोन टर्निंग पॉइंट आणि मिळाले घवघवीत यश...
- असा झाला ‘फिनाेलेक्स’चा जन्म ...
बातम्या आणखी आहेत...