आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवल्याने आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बालाजी तांबे - Divya Marathi
डॉ. बालाजी तांबे
संगमनेर (अहमदनगर)- पुण्यातील कार्ला येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला आहे. 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठी उपाय सूचवल्याने लेखक या नात्याने तांबे यांच्यावर तर प्रकाशकावरही गुन्हा दाखल झाला आहे. तांबे यांनी हे पुस्तक छापून पुत्रप्राप्तीसाठी उपाय सूचवून त्याचा प्रचार व प्रसार करून प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनटीडी) भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बालाजी तांबे यांच्यासह प्रकाशकांवर हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सामाजिक कार्यकर्ते गणेश बो-हाडे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंवर महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य आरोग्य अधिका-यांकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीत पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि त्याचसोबत विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती. यानंतर संबंधित जिल्हा आरोग्य अधिका-यांनी याबाबत लेखक, प्रकाशकासह विक्रेत्याकडे याबाबत लेखी खुलासा मागवला होता. याबाबत लेखक बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात जे सांगितले आहे तोच आपण मांडले आहे असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर हा विषय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत एक आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या समितीने तांबे यांच्या पुस्तकाचा अभ्यास करून अहवाल नुकताच दिला. यात आयुर्वेद ज्ञान हे जरी प्राचीन असले तरी हे ज्ञान देताना नव्या बदलाची, कायद्याची नोंद घेतली पाहिजे. सरकारने स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी आणलेल्या कायदा सर्वांनाच खासकरून डॉक्टरांना माहितच पाहिजे व त्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे अहवालात नमूद केले आहे. तसेच बालाजी तांबे यांनी पीसीपीएनडीपी कायद्याचा प्रथमदर्शनी भंग केल्याचे सिद्ध होत असल्याचे म्हटले. त्यामुळे अखेर बालाजी तांबे यांच्याविरोधात संगमनेर येथे गुन्हा दाखल झाला आहे.