पुणे - जेवणाचा डबा घेऊन घरी येणार्या एका 15 वर्षीय मुलीला मोबाइल, सोन्याचे कानातले, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका माजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस चौकीत दाखल झाला आहे. नागराज सुदाम शिंदे (वय 35, मु. रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पीडित आईच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली होती. नागराज हा काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून काम करत होता. मात्र, सध्या तो सेवेत नाही. सध्या तो पुण्यात कात्रज परिसरात एका सोसायटीत राहण्यास आला. मागील सात महिन्यांपासून त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेलेली आहे. या दरम्यानच्या काळात आपली मुलगी त्याला जेवणाचा डबा पुरवत होती. ती सोसायटीतील काही मुलांसमवेत शिंदे याच्या घरी कॅरम खेळण्यासाठी जात होती.
मागील एक ते दोन महिन्यांपासून शिंदेने मोबाइल, सोन्याच्या रिंग व फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कळल्यानंतर तिच्या आईने विचारपूस केली असता, शिंदेकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे पीडित मुलीने सांगितले.
या गोष्टीचा जाब आईने शिंदेला विचारल्यानंतर त्याने हा प्रकार कोणालाही सांगू नये, असे बजावले. मात्र, सदर महिलेने त्याच्याविरोधात 30 जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, शिंदे याने न्यायालयातून तात्पुरता जामीन अर्ज मंजूर करून घेतला. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश जी. टी. उत्पात यांनी दिले आहेत.