पुणे- भोर येथील राजवाड्यात शुटींग करत असताना निर्माता, दिग्दर्शक संजय लिला भन्साळी व अभिनेता रणवीर सिंग यांनी एका वकिलास शासकीय कार्यालयात जाण्यास मज्जाव करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी भन्साळी व सिंग यांच्याविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी अॅड. वाजीद खान रहीम खान-बिडकर (रा. चंदननगर, खराडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोर येथील राजवाड्यात काही शासकीय कार्यालये असून त्या ठिकाणी सध्या शुटींग सुरु आहे. शुक्रवारी मी एका विद्युत केसच्या प्रकरणात राजवाड्यातील कार्यालयात जात होतो. त्यावेळी संजय भन्साळी यांनी 'आपले काय काम आहे, आप काले कोट वाले, तुम्हारा जो काम है वो बाद मे करना'. इतक्यात रणवीर याने काही न पाहता, 'इनको बाहर निकालो' असे म्हणून त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून मला धक्काबुक्की करून बाहेर काढले. याबाबत मी या दोघांविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्याकरीता गेलो. मात्र, पोलिसांनी माझी तक्रार अदखलपात्र असल्याचे सांगून गंभीर गुन्हा दाखल करण्यास मनाई केली, असे आरोप खान यांनी केला आहे.