पुणे- पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील खेड तालुक्यातील भाम हद्दीतील विजय लॉजिस्टिक या टाटा मोटर्सशी संबंधित कंपनीच्या गोदामाला मंगळवारी रात्री आठच्या सुमारास लागलेल्या आगीत कोट्यावधीचे नुकसान झाले. ही आग इतकी भीषण होती की गोदामातील सर्व माल जळून खाक झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या दुर्घटनेत कंपनीच्या सुमारे अकरा एकर जागेतील इमारतीसह दोन मोठी शॉप, कच्चा व पक्का माल, यंत्रसामग्री, कार्यालय, फर्निचर आगीम भस्मसात झाले आहे.
रात्री आठच्या सुमारास आग लागल्याचे कंपनीतील कामगार, सुरक्षारक्षक व परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. आगीचा फैलाव संपूर्ण 11 एकर परिसरात झाला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने अख्खा कारखाना आगीने वेढला. आगीची माहिती मिळताच चाकण परिसरातील खासगी कंपन्यांचे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब व 60 ऑफिसर घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र आग चौफेर पसरली होती. कंपनीत मोठ्या प्रमाणात कच्चा व पक्का माल होता. या मालानेच पेट घेतल्याने चार दिवस आग विझू शकली नाही. आगीचे तांडव पाहून अग्निशमन दलाचे अधिकारीही हतबल झाले होते. या घटनेत जीवितहानी झाली नाही. रात्री आठची वेळ जेवणाची असल्याने कामगार जेवणासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे जीवितहानी टळली. एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे.