पुणे - आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुण मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणा-या आई वडिलांसह त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील दापोडी-फुगेवाडीदरम्यान बुधवारी घडली. सागर बलभीम कांबळे (२३), बलभीम कांबळे (५५) आणि श्यामल बलभीम कांबळे (५३, सर्व रा. फुगेवाडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. सागर याला दारूचे व्यसन हाेते. त्यामुळे घरात सतत वाद हाेत असे. बुधवारीही त्याचा अाईवडिलांशी वाद झाला. त्यामुळे संतापाने ताे फुगेवाडी उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळाकडे गेला.
मुलाला अात्महत्या करण्यापासून राेखण्यासाठी वडील बलभीम व अाई श्यामल कांबळे हे त्याच्यामागे धावत गेले. त्याच वेळी लाेणावळ्याहून पुण्याच्या दिशेने लाेकल जात हाेती. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही रेल्वेखाली चिरडले गेले. रेल्वेची जाेरदार धडक बसल्याने तिघांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. घटनेनंतर पोलिसांनीही तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.