आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुमखुमी आलीच असेल तर लढा स्वबळावर, पतंगरावांचा अजित पवारांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेतात. तरीही काही जण स्वबळाची भाषा करीत आहेत. एवढीच जर खुमखुमी आली असेल तर खुशाल स्वबळावर लढा. आम्हीही लढू असे काँग्रेसचे नेते व वनमंत्री पतंगराव कदम यांनी सांगत अजित पवारांना एक प्रकारे आव्हानच दिले.
पुणे विभागातील दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई याबाबत पतंगराव कदम यांनी जलसंपदा, महसूल विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कदम यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
पतंगराव म्हणाले, विधानसभा निवडणूक तोंडावर आली की अनेकांच्या अंगात स्वबळाचे वारे नाचायला लागते. पण त्यांना काय करायचे ते करू द्या. कारण आघाडीचे सर्व निर्णय दिल्लीत होतात आणि ते फक्त सोनिया गांधी आणि शरद पवारच घेतात. त्यामुळे इथे खाली बोलणा-यांकडे लक्ष देत नाही. गेल्या 14 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी एक आहे. आमच्याच आघाडीचे सरकार आहे. तरीही अशी भाषा केली जाते हे चुकीचे आहे. राष्ट्रवादीने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही आमचे लढू आम्हाला काही फरक पडत नाही. काँग्रेसने आतापर्यंत अनेक जय-पराजय पचवले आहेत. पण कोणाला स्वतंत्र लढून सरकार स्थापण्याची स्वप्ने पडू लागली आहेत त्यांनी खुशाल स्वबळावर लढावे व खुमखुमी जिरवून घ्यावी असा टोला कदम यांनी अजित पवार यांना हाणला.

फाईल फोटो: (वनमंत्री पतंगराव कदम)