अहमदनगर/ पुणे- राज्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी काहीजण तुरुंगात गेलेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या काही मंत्र्यांनी फार मोठे घोटाळे केलेले आहेत. यानंतर अजित पवार यांच्यासह उर्वरित सर्वजण लवकरच तुरुंगात जातील असे वक्तव्य राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 15 वर्षांपासून बंद असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कुळधरण येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, राज्यातील धरणांचा पाणीसाठा आणि पडणार्या पावसाचे नियोजन करणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यात सर्व पिके ठिबकवर घेतली जातात. त्याचेच अनुकरण राज्यातील शेतकर्यांनी करण्याची गरज आहे. उसासाठी पाटाचे पाणी देणे बंद करावे लागणार आहे. पाटबंधारे खात्यातील घोटाळा साफ करण्यासाठी फार मोठा झाडू लागणार आहे. त्यातील अनेकजण तुरुंगात जात आहेत. बाकीचेही जाणार आहेत. अजित पवार आणि त्यांच्या कंपनीने या खात्यात गैरव्यवहार केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले आहे.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, कर्जत तालुक्यातील कुकडी प्रकल्प हा राज्यातील सर्वाधिक रखडलेला प्रकल्प असल्याचा ठपका चितळे समितीने आघाडी सरकारवर ठेवला होता. तालुक्यातील कालव्याची कामे 15 वर्षांपासून बंद करण्यात आलेली होती, ती आता पुन्हा सुरू झाली आहेत. कुकडीच्या पाण्यासाठी कर्जत तालुक्यावर नेहमी अन्याय होतो. आता समान पाणीवाटप करण्यात येणार आहे.
विसापूरमधून पाणी सोडणार- गिरीश महाजन
श्रीगोंदे तालुक्यात काही भागांत पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याने या भागातील शेती वाचली पाहिजे. फळबागा जगल्या पाहिजे. यासाठी विसापूर तलावातून पाणी सोडू, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी सेवा संस्थेला गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले, विसापूर तलावातून पाच गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. याप्रश्नी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले आहे. पाचपुतेंनी सांगावं अन् आम्ही ते ऐकावं... असे कधी होणार नाही. श्रीगोंदे तालुक्याचा कोणताही प्रश्न असो त्यासाठी मी सर्व ती मदत करेन. तुम्ही फक्त प्रश्न घेऊन मुंबईला या त्या संदर्भात मी सगळे अडचण दूर करेन, असेही महाजन यांनी सांगितले.