आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Health Minister Dr. Dhaultrao Aaher No More

माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- माजी आरोग्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. 1995 ते 1999 या दरम्यान युती सरकारच्या काळात आहेर यांनी आरोग्यमंत्रीपद संभाळले होते. आज सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर देवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दौलतराव आहेर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून 1989 साली लोकसभेवर निवडून गेले होते. पुढे युती सरकारच्या काळात भाजपने त्यांना कॅबिनेटमंत्रीपदाची संधी दिली. युती सरकार पडल्यानंतर आहेर यांनी काही काळ राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने तापी खोरे महामंडळाचे अध्यक्षपद दिले मात्र तेथेही आहेर फार रमले नाहीत. 2009 साली पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा डॉ. राहुल आहेर हे चांदवड-देवळ्याचे भाजपचे आमदार बनले आहेत.
महत्त्वपूर्ण नेता गमावला : मुख्यमंत्री
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्याने एक महत्त्वपूर्ण नेता गमावला असल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. अहेर यांनी 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. या पदावरून त्यांनी आदिवासी भागातील कुपोषाणावर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. प्रारंभीच्या काळात त्यांच्याच धडपडीतून नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले होते.
विधानसभेसह त्यांनी नवव्या लोकसभेतही नाशिकचे प्रतिनिधीत्व केले होते. तापी खोरे महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय, शैक्षणिक, सहकारी, कृषी व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य एक वेगळा ठसा उमटविणारे होते.