सांगली- भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील आयात उमेदवार घेऊन त्याला तिकीट दिले. आता त्याला निवडून आणता येईना म्हणून देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदींना तासगावात सभा घ्यायला भाग पाडले. पंतप्रधानांनी येथे सभा घेतली तरी येथील जनता मलाच निवडून देणार आहे. मात्र माझा पराभव व्हावा म्हणून यांना पंतप्रधानांना येथे आणावे लागते ही याची लायकी अशा शेलक्या शब्दात माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
तासगाव-कवडेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आर आर पाटील आणि अजित घोरपडे यांच्यात अटीतटीची लढाई आहे. भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. भाजपला आर आर पाटील यांचा पराभव करायचा आहे. यासाठी भाजपने अजित घोरपडे यांना पाहिजे ती रसद पुरविली आहे. याचबरोबर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी तासगावात जंगी सभा घेऊन भाजपने शक्तीप्रदर्शन केले. मात्र,
आपल्या मतदारसंघात आबा या नावाने प्रसिद्ध आर आर पाटील यांच्यामागे सामान्य मतदार असल्याचे चित्र आहे. याबाबत बोलताना आबा यांनी तासगावातील एका गावात भाजप व अजित घोरपडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आबा म्हणाले, माझा पराभव व्हावा यासाठी भाजपने देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र, त्यांना येथील जनता कधीही स्वीकारणार नाही. भाजपचे घाणेरडे राजकारण आम्हाला पहिल्यापासून माहित आहे. आताच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्राला कळले आहे. राज्यातील जनता आगामी काळात भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा पराभव करण्यासाठी यांना पंतप्रधानांना आणावे लागते हीच याची लायकी खरी आहे व आज ती लायकी जनतेसमोर आली आहे असे सांगत अजित घोरपडे यांना लक्ष्य केले.