आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मोहन धारिया अनंतात विलीन, ‘वनराई’ पोरकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी केंद्रीय मंत्री डॉ. मोहन धारिया यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी वैकुंठधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘पद्मविभूषण’ गौरवप्राप्त धारियांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले होते. 21 पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी डॉ. धारिया यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले.


डॉ. धारिया यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी वनराईच्या कार्यालयात ठेवले होते. यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा वैकुंठात आली. डॉ. धारिया यांच्या स्मरणार्थ पिंपळाचे रोपटे वैकुंठात लावण्यात आले. केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आदी राजकीय मंडळींनी या रोपाला पाणी घातले. ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, उल्हास पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, आमदार गिरीष बापट, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, अभिनेते राहुल सोलापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.


अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ
डॉ. धारिया यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी रीघ लागली होती. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी डॉ. धारियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. वैकुंठात झालेल्या अंत्यविधीसही असंख्य नागरिक, सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते हजर होते. वैकुंठात झालेल्या श्रद्धांजली सभेत विविध नेत्यांनी आदरांजली वाहिली. पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांनी पुणेकरांच्या वतीने आदरांजली वाहिली. 17 ऑक्टोबरला डॉ. धारियांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा बोलावल्याचे त्यांनी सांगितले.


अतुलनीय देशसेवा
‘डॉ. धारिया यांनी संसदेत व समाजात केलेले देशसेवेचे कार्य अतुलनीय आहे. पर्यावरण, शेतकरी वर्गासाठी त्यांनी महनीय काम केले.
प्रणव मुखर्जी, राष्‍ट्रपती


सच्च गांधीवादी हरपला
‘‘डॉ. धारिया यांचे व्यक्तिमत्त्व संतासारखे होते. पर्यावरण रक्षण, ग्रामविकासात त्यांनी वाहून घेतले. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच खरी आदरांजली.
के. शंकरनारायणन, राज्यपाल