पुणे - राज्याचे माजी पर्यटन राज्यमंत्री आणि पुण्याचे माजी महापौर चंद्रकांत छाजेड (वय ६७) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय काळे, अनिल भोसले यांच्यासह सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. छाजेड यांचा जन्म १९५० मध्ये झाला. त्यांनी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुण्यातील बोपोडीचे ते १९७८ ते २००२ यादरम्यान नगरसेवक होते. याचदरम्यान १९८७ ते १९८८ त्यांनी महापाैरपदही भूषवले. पुढे १९९९ ते २००९ मध्ये अामदार हाेते.
सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यटन राज्यमंत्रिपदाची जबाबदारी हाेती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी छाजेड यांना अादरांजली वाहिली.