आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Pune Cp Gulabrao Pol Resigned From Police Force

गुलाबराव पोळ यांचा पोलिस दलाला रामराम, बदलीने होते नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पोलिस दलाला रामराम ठोकला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पोळ यांची पुणे पोलिस आयुक्तपदावरून वीज वितरण कंपनीत अप्पर पोलिस महासंचालकपदावर बदली झाली होती. मुख्य प्रवाहातून बाहेर काढल्याने पोळ नाराज होते. मात्र, नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा तपास करण्यात त्यांना अपयश आल्याने पोळ यांना पुण्यातच ठेवले तर विरोधकांसह जनसामन्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल, या भीतीने राज्य सरकारने त्यांना साईडलाईनला टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी सतीश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पोळ यांना राजकारणात उडी घ्यायची असल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पोळ हे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी अशा माण तालुक्यातील आहेत. आगामी काळात विधानसभेची निवडणूक तेथून लढविण्याचा पोळ विचार करू शकतात असे सांगण्यात येत आहे. माणमध्ये सध्या जयकुमार गोरे हे अपक्ष आमदार आहेत. पोळ तेथून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात. या पक्षांनी तिकीट न दिल्यास ते अपक्षही निवडणूक लढवू शकतात. माण तालुक्याला आतापर्यंत गंभीर नेतृत्त्व कधीच मिळालेले नाही. तसेच हा तालुका दुष्काळग्रस्त असल्याने राजकीय, सामाजिक पातळीवर त्याला कधीच महत्त्व दिले गेले नाही. दुष्काळी व अकृषक भाग असल्याने येथील स्थानिक लोक रोजगाराच्यानिमित्ताने मुंबई-पुण्यात स्थिरावलेले आहेत. पोळ यांनी पोलिस दलात काम केल्याने व त्यांना राजकारणाची रूची राहिल्याने माणच्या भागातील लोकांशी त्यांचा जनसंपर्क असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच निवृत्तीसाठी 15 महिन्यांचा काळ बाकी असताना व खाबूगिरीचे पद नसल्याने राजीनामा देऊन राजकीय नशिब अजमावण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पोळ यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री गारपीटग्रस्त भागांना भेटी देत असल्याने त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होण्यास एक-दोन दिवस लागू शकतील असे सांगण्यात येत आहे.