आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखून पुण्‍यात फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - इंटरनेट वरील लिंकेडीन वेबसाइटवर पुण्यातील एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाची माहिती काढून त्याच्याशी ई-मेल, मोबाइलवर संपर्क साधून एका परदेशी नागरिकाने त्याला पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी याप्रकरणी साऊथ आफ्रिकेच्या एका नागरिकास अटक करून त्याच्या तीन साथीदारांसह गुन्हा दाखल केला आहे. लिंकेडीन वेबसाइटवरून फसवणुकीचा हा पहिलाच गुन्हा पुण्यात दाखल
झाला आहे.
अ‍ॅडमस इमा जुमा (सध्या, रा. मुंबई, मु. रा. साऊथ आफ्रिका) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात उभे केले असता 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे तीन साथीदार जेफ्री हाव्री, बेरी ब्राऊन व लिंकन (सर्व मु. रा.साऊथ आफ्रिका) यांचा पोलिस शोध घेत असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. एम. बाबर यांनी सांगितले. याप्रकरणी देबाशिष रामचंद्र माढी आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.
देबाशिष माढी यांची कोरेगावपार्क येथे एन्सार्म सोल्युशन नावाने सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यांचे लिंकेडीन वेबसाईटवर खाते असून त्याचा वापर ते वैयक्तिक कामासाठी करतात. त्यांच्या प्रोफाईलवर दिल्ली येथील जेफ्री हाव्री याने ओळख वाढवून त्यांना व्यवसायात पैसे गुंतवणुकीची इच्छा असल्याचा ईमेल केला. बिझनेस प्रापोजलनुसार एक मिलियन डॉलर गुंतवणुकीची तयारी असल्याचे दाखवले. गुंतवणुकीतील पहिले कन्साईमेंट क्लिअरन्ससाठी त्याने देबाशिष यांना 1350 डॉलर (80 हजार रुपये) देण्याची मागणी केली. देबाशिष यांना याप्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधत जेफ्री यास समक्ष भेटण्यास सांगितले. जेफ्रीचे वतीने जुमा हा पैसे स्वीकारण्यास गुरुवारी पुण्यात आला असता, त्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले.
बनावट आंतरराष्‍ट्रीय ईमेल व फोनचा वापर
बाबर म्हणाले, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके व सहाय्यक पोलिस आयुक्त गोपीनाथ माने यांच्या मार्गदशर्नाखाली हा सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले. तपासात आरोपीने मोबाईलवर अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून दिल्ली, मुंबई, यु.के. येथून ईमेल व फोन केल्याचे भासवले. मात्र, प्रत्यक्षात ते स्थानिक पातळीवरून करण्यात आले आहे.