आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Next Year Law School Will Start Says Rajesh Tope

‘लॉ स्कूल’ला यंदा प्रवेश मिळणार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- औरंगाबाद येथील बहुचर्चित नॅशनल लॉ स्कूल (एनएलएस) अजून अधांतरीच आहे. औरंगाबादसह मुंबई येथे ‘एनएलएस’ सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता देऊन एक पाऊल पुढे टाकले असले तरी यासंदर्भातला कायदा मंजूर होणे बाकी आहे. त्यामुळे औरंगाबादचे लॉ स्कूल यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरू होऊ शकणार नाही.

मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीनपैकी कोणत्या शहरातल्या लॉ स्कूलला परवानगी द्यायची, याबद्दल मंत्रिमंडळात मतभेद होते. अखेरीस मुंबई आणि औरंगाबादेत लॉ स्कूल करण्यास बुधवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. प्रत्यक्ष लॉ स्कूल सुरू करण्यासाठी विधानसभेत कायदा मंजूर करून घ्यावा लागतो. हा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी मंजूर झाला नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट’ घेण्यात येते. दरवर्षी ही चाचणी जानेवारीच्या सुमारास होते. ही वेळ टळून गेल्याने यंदा औरंगाबादच्या लॉ स्कूलसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाहीत. शिवाय, लॉ स्कूल सुरू करण्यासाठी अनिवार्य असलेला कायदादेखील विधानसभेत मंजूर व्हावा लागतो. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतला जाईल.’

जूनमध्ये मंजुरी घेऊ
सन 2014-15 च्या शैक्षणिक वर्षात औरंगाबादचे लॉ स्कूल सुरू व्हावे, हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश लॉ स्कूलचे व्हाइस चान्सलर असतात. स्कूलच्या बोर्डावरदेखील उच्च् न्यायालय स्तरावरील तज्ज्ञ मंडळींचा समावेश असतो. स्कूलचा शैक्षणिक स्तर अत्यंत दर्जेदार असतो. येत्या जूनमध्ये विधानसभेच्या मंजुरीनंतर लॉ स्कूल सुरू करण्यासाठी राज्यपालांची सही मिळवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे टोपे म्हणाले.

नियोजित जागा करोडीत
> औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथे होणार लॉ स्कूल.
> लॉ स्कूलसाठी केली पन्नास एकर जागेची खरेदी.
> पहिल्या वर्षाला असेल शंभर ते दीडशे विद्यार्थी क्षमता.
> राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देणार.

औरंगाबादच्या नॅशनल लॉ स्कूलमधील प्राचार्य आणि इतर प्राध्यापक वर्गाच्या नेमणुकीची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याने स्कूलची इमारत व इतर पायाभूत सुविधांसाठी राज्याच्या तिजोरीतून निधीची व्यवस्था केली जाईल.
-राजेश टोपे, उच्च् व तंत्र शिक्षण मंत्री