मुंबई/ पुणे- पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत चार महिन्यांपासून विद्यार्थी करत असलेल्या आंदोलनात राष्ट्रपतींनीच मध्यस्थी करावी, अशी विनंती संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुवारी केली. प्रख्यात दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, मणिरत्नम, गिरीश कासारवल्ली, रसूल पुकुट्टी, विद्या बालन आणि अपर्णा सेन यांच्यासह बॉलीवूडमधील दोनशे दिग्गजांनी हे निवेदन पाठवले आहे.
एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांनी मुंबईत बुधवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राची प्रत माध्यमांनादिली. या वेळी दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन म्हणाले, आजच्या िचत्रपट व्यवसायाच्या काही नव्या मागण्या आहेत. नवे प्रश्न आहेत. नवे तंत्रज्ञान आले आहे. हे सारे एफटीआयआय मध्ये कुठेही दिसत नाही. आमचा सरकारला मुळीच विरोध नाही. मात्र, संस्थेवर नेमणूक करताना सरकार या क्षेत्रातील मान्यवरांचे मत विचारात घेत नाही. सरकारच्या या धोरणात बदल व्हायला हवा, इतकीच आमची इच्छा आहे. चित्रपटाशी संबंध नसणारी मंडळी एफटीआयआय सारख्या संस्थेवर नेमून सरकार भारतीय सिनेमा मारत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पुण्यात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण
केंद्र सरकारची असंवेदनशीलता आणि दुर्लक्ष यामुळे व्यथित झालेल्या फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यानी आता थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाच पत्र पाठवून साकडे घातले आहे. तसेच अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी आलोक अरोरा, हिलाल सवद आणि हिमांशु शेखर या विद्यार्थ्यानी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.