आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीआयआय आंदोलनात शाहिरांच्या कवनांची साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘फिल्म अंॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चाैहान यांच्या नियुक्तीला विराेध करत विद्यार्थ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. या आंदोलनाला रविवारी शाहीर संभाजी भगत यांच्या कवनांची साथ मिळाली आणि संस्थेच्या मुख्य चित्रपटगृहाचा परिसर शाहिरांच्या कवनांनी दुमदुमला.

संस्थेमधील पायाभूत असुविधा आणि वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या मागण्यांसाठीही विद्यार्थी आग्रही आहेत. या आंदाेलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी येथे केला. शाहीर, कवी, संगीतकार, गायक आणि दलित चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते संभाजी भगत यांनी रविवारी सायंकाळी संस्थेच्या मुख्य चित्रपटगृहात सादरीकरण केले आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही लोकगीतांची साथ दिली. अदूर गोपालकृष्णन, गिरीश कासारवल्ली, संतोष शिवन यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि समीक्षकांनीही आमची भूमिका मान्य केली आहे, असे विद्यार्थी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

या आंदाेलनाची देशपातळीवर चर्चा हाेत असून माेदी सरकारने भाजपचे कार्यकर्ता असल्यामुळेच चाैहान यांची अध्यक्षपदी वर्णी लावल्याचा आराेप हाेत आहे. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मान्य केली आहे, तरीही आंदाेलन थांबलेले नाही.

सरकारने विचार करावा
‘एफटीआयआय’च्या अध्यक्षांची निवड परंपरेला अनुसरूनच व्हावी. एवढ्या माेठ्या परंपरेच्या संस्थेत राजकीय घुसखाेरी करणे अयाेग्य आहे. ही संस्था म्हणजे भारतीय चित्रपटाचं भविष्य आहे. त्यामुळे लाेकशाही पद्धतीने विद्यार्थी करत असलेल्या मागण्यांचा सरकारने विचार करावा. - संभाजी भगत, शाहीर