आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफटीआयआय’ विद्यार्थ्यांचा दिल्लीत मोर्चा ; जंतरमंतर ते संसदेदरम्यान ‘प्रोटेस्ट मार्च’ करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेले आंदोलन प्रसारमाध्यमांद्वारे जगभरात पोहोचले. मात्र, माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना कोणतीही दाद दिलेली नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवारी (३ ऑगस्ट) दिल्ली येथे ‘प्रोटेस्ट मार्च’ काढण्यात येणार आहे.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे गेल्या ५१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तरीही शासन दरबारी त्याची दखल घेतली गेली नाही. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे सोमवारी दुपारी २ वाजता जंतरमंतर ते संसदेदरम्यान ‘प्रोटेस्ट मार्च’ काढण्यात येणार आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी एफटीआयआय येथून आजी-माजी असे एकूण १५० विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्ली येथे प्रोटेस्ट मार्च असला तरी यासाठी सर्व विद्यार्थ्यांना जाणे शक्य नव्हते. तेथे मोर्चा असला तरी एफटीआयआय येथील आंदोलन सुरूच राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे, मुंबई, नागपूर, बंगळुरू येथेही निदर्शने केली जाणार आहेत.कोणत्याही बॅनरशिवाय सहभागी व्हावे एफटीआयआयचे आंदोलन सुरू झाल्यापासून या आंदोलनाला अनेक भाजपविरोधी राजकीय पक्षांसह डाव्या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ एफटीआयआयच्या गेटवर निदर्शनेही केली आहेत. या सर्व संघटनांचे कार्यकर्ते मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांना समर्थन देत कोणत्याही बॅनरशिवाय मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन स्टुडंट असोसिएशनने केले आहे. त्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रालयाला विद्यार्थ्यांनी ६ पत्रे पाठवली
आंदोलनावर तोडगा निघावा, विद्यार्थी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात संवाद व्हावा, यासाठी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनने मंत्रालयाला आतापर्यंत तब्बल ६ पत्रे पाठवली आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतेच उत्तर मिळालेले नाही. शनिवारी रात्री उशिरा आणखी एक पत्र मंत्रालयाला विद्यार्थ्यांनी पाठवले आहे. यामध्ये ‘आंदोलनामुळे प्रशासनाबरोबरच विद्यार्थीही भरडले जात असून किमान संवादाची प्रक्रिया सुरू करावी,’ असे लिहिण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...