पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची नेमणूक रद्द करण्यासाठी गेल्या ९२ दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. गुरुवारी सकाळ पासून उपोषणास बसलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी शुक्रवारी दुपारी एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडल्याने त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एफटीआयआय आंदोलनात तोडगा निघत नसल्याने अलोक अरोरा, हिलाल सवाद आणि हिमांशू शेखर या तीन विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याने तसेच रक्तदाब कमी झाल्याने हिलाल सवाद या विद्यार्थ्यास रुग्णालयात दाखल करण्यात अाले. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.