आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fursungi Kachara Depot Issue Mp Supriya Sule Visits

पुण्यातील कचराकोंडीला आठवडा पूर्ण, सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला आज आठवडा पूर्ण झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून डेपोवर येणारा कचरा अडविण्यात आला आहे. याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असले तरी ग्रामस्थ माघार घेण्यास अजिबात तयार नाहीत. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फुरसुंगी इथे सुरु असलेल्या कचरा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला आज भेट दिली.
फुरसुंगी येथील कचरा डेपो हा येथील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याबाबत पक्षीय राजकारण करू नये. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्र्यांनी यात पुढाकार घ्यावा आणि महानगरपालिकेला सर्वतोपरी मदत करावी. मी सातत्याने या प्रश्नावर लक्ष घातले असून यापुढेही त्याचा पाठपुरावा करत राहणार आहे. या प्रश्नाची संपूर्ण सोडवणूक करण्याच्या दृष्टीने सर्वांकडूनच प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
फुरसुंगी परिसरातील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी फुरसुंगी व देवाची उरळी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय 4 महिन्यांपूर्वी महापालिकेस नवीन प्रकल्प उभारण्यासाठी चार महिन्यांची मुदत देताना घेतला होता. त्या वेळी हे कचरा आंदोलन विद्यमान राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. मात्र, आता शिवतारेच सत्तेत असल्याने पुकारलेल्या मुदतीनुसार, शिवसेना-भारतीय जनता पक्षाला घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनावर तोडगा काढण्याची जबाबदारी राज्यशासनाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सोपविली आहे. मात्र, बापट यांनी शहरातील कचऱ्याचे प्रमाण जास्त दाखवून पैसे लाटले जात असल्याचा आरोप केल्याने वाद चिघळत चालला आहे. त्यावरून नवीन वादला तोंड फुटले आहे. तर राष्ट्रवादीने पुरावे देण्याची मागणी केली असून, शिवसेनेने याबाबतचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. एकीकडे ग्रामस्थांचे आंदोलन सुरु आहे तर, दुसरीकडे त्यावर तोडगा काढण्याऐवजी या प्रश्नावरून राजकीय पक्ष आता राजकारण करू लागले आहेत. पुणे शहरात हजार ते 1000 टन कचरा निर्माण होत असून तो, 1500 ते 1600 टन होत असल्याचे दाखविले जात असल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली होती. त्याला प्रत्त्युत्तर देत या प्रकाराची सत्यता तपासण्याचे आदेश दिले असून, पालकमंत्र्यांकडे पुरावे असतील तर ते त्यांनी पालिका आयुक्तांना द्यावेत, अशा शब्दांत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बापट यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.
दुसरीकडे, पुणे शहरांत जागोजागी कच-याचे ढीग तयार झाले असून राजकारणी मंडळींना त्याचे काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात कच-याची गंभीर स्थिती असताना आधी कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य न देता राजकारण व श्रेयवादाची लढाईत राजकीय पक्ष रंगले आहेत.