आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Future Scientist Finding Olympiad Starts In Pune

भावी शास्त्रज्ञ शोधणारी ‘ऑलिम्पियाड’ आजपासून होणार पुण्यात सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांतील बुद्धिमान विद्यार्थ्यांमधून उद्याच्या शास्त्रज्ञांचा शोध घेणारी आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड बुधवारपासून पुण्यात होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणेच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिकतेला वाव देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी ऑलिम्पियाड घेतली जाते.
भारतात प्रथमच होणा-या या ऑलिम्पियाडचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिक काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे. 42 देशातील 220 विद्यार्थ्यांत सहा दिवस ही स्पर्धा रंगणार असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचे विजेते घोषित होतील. आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडचे समन्वयक डॉ. परेश जोशी, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या संचालक जयश्री रामदास, विज्ञान ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. विजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अवकाशशास्त्र व खगोल विज्ञान, बाल विज्ञान आणि गणित या सहा विषयांवरच्या परीक्षा द्याव्या लागतात. स्पर्धेतील 40 टक्के गुण प्रात्यक्षिकांना तर 60 टक्के गुण लेखी सैद्धांतिक मांडणीला असतात. स्पर्धेचा सगळा भर हा आंतरविज्ञानशाखीय अभ्यासावर असतो. विद्यार्थ्यांनी विविध विषय, अ‍ॅप्लिकेशन्सवर भर द्यावा अशीच स्पर्धेची रचना असते, अशी माहिती सिंह यांनी दिली.
सध्याच्या प्रचलित विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आणि प्रयोगशीलता वाढवणे यास पुरेसा वाव दिला जात नाही,’’ असे सिंह म्हणाले.
तुमच्या पाल्याची संधी हुकली?
आठवी ते दहावी आणि दहावी ते बारावी अशा दोन गटांतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय दरवर्षी विज्ञान ऑलिम्पियाड होते. विजेत्यांना विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या सर्वोच्च् संधींचे दरवाजे उघडतात. म्हणूनच ऑलिम्पियाडसाठी देशपातळीवर चुरस असते. सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांमधून बारा जणांची निवड अंतिम संघात होते. यासाठीच्या प्रवेश परीक्षा नोव्हेंबरपासून सुरू होतात. नावनोंदणी मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच करावी लागते. अधिक माहितीसाठी http://olympiads.hbcse.tifr.res.in
किंवा http://www.iapt.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑलम्पियाडच्या निवड प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आर्थिक भार पडत नाही आणि निवड झाल्यानंतर भरघोस शिष्यवृत्ती मिळते.
आशियाई देश आघाडीवर
‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताने सातत्याने उज्ज्वल कामगिरी नोंदवली आहे. भारताचा संघ नेहमीच पहिल्या पाचात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलाय. अवकाशशास्त्र-खगोल विज्ञानात भारत नेहमीच पहिल्या दोनात येतो,’ अशी माहिती डॉ. परेश जोशी यांनी दिली.
ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्र नाही
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये प्रत्येक देशातील बारा विद्यार्थ्यांचा संघ सहभाही होतो. यंदाच्या ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवत असल्याने भारताला प्रत्येकी बारा जणांचे दोन संघ सहभागी करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, यात मुंबईचा एक वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश यंदा झालेला नाही. शालेय स्तरावरून संघ निवडणे आणि त्यांना ऑलिम्पियाडसाठी प्रशिक्षण देण्याची तयारी वर्षभर
आधी सुरू होते.