आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या कलानेही नाही चालत भाजप, नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘ही पार्टी ना कधी अटलजी-अडवाणींच्या मनाने चालली. मीही पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा ना माझ्या मताप्रमाणे चालली. ना ही पार्टी आता मोदी-शहांच्या कलाने चालते. या पक्षात कोणाच्या मनासारखे काही होत नाही, हे मी स्वानुभवावरून खात्रीने सांगतो,’ असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात दिले. ‘मंत्री, मुख्यमंत्री माजी होतो पण कार्यकर्ता कधीच ‘माजी’ होत नाही. त्यामुळे पक्षाच्या संख्यात्मक, गुणात्मक वाढीसाठी झोकून द्या. पदे आपोआप चालत येतील’, असा सल्लाही त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप रविवारी गडकरी यांच्या भाषणाने झाला. या वेळी गडकरी यांनी नेते-कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत आदर्श कार्यकर्ता होण्याचा उपदेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाच्या राज्य प्रभारी सरोज पांडे, संघटनमंत्री व्ही. सतीश आदी या वेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘इतर पक्षांपेक्षा अापल्या पक्षाचे ‘कॅरेक्टर’ वेगळे आहे. हा पक्ष एका नेत्यावर किंवा एका घराण्यावर अवलंबून नाही. कार्यकर्ते आणि संघटनेच्या मतानुसार येथे निर्णय होतात; कोणाच्या वैयक्तिक इच्छेनुसार नव्हे. सत्ता नव्हती. कार्यकर्ते नव्हते तेव्हा आपला पक्ष, नेते चेष्टेचा विषय होते. मात्र लाखो कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष समर्पणामुळे माझ्यासारख्या अनेकांना सत्तेच्या शिखरावर बसण्याची संधी मिळाली. आता अनुकूल काळ आल्यानंतर संघटना म्हणून कसे राहू याची भीती सतावते. नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. त्यांना सामावून घेताना आपल्या विचारांशी जोडण्याचे काम करावे लागणार आहे,’ याकडेही गडकरींनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी काम केले पाहिजे. ‘शत-प्रतिशत भाजप’चे ध्येय ठेवणे नैसर्गिक आहे. मात्र हे करताना काही मर्यादा स्वतः ठरवून घ्या. नेते, पदाधिकाऱ्यांचे चालचलन आदर्शवतच असले पाहिजे, असा सल्ला गडकरींनी दिला. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मुंबईत कमी आणि जिल्ह्यात जास्त दिसले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

चहापेक्षा ‘किटली’ गरम!
‘मंत्रिपद वगैरे फालतू आहे. यात फार गुंतू नका. जसे तुमचे मंत्रिपद जाईल तसे कोणी तुमच्याबरोबर येणार नाही. मंत्रिपद फक्त पाच वर्षांपुरते आहे. सगळे ‘टेम्पररी’ आहे. सरकारी गाडी टेम्पररी, पीए टेम्पररी. हा पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम. मी महाराष्ट्रातले सांगत नाही बरे. एखादी टोपी जर एखाद्याच्या डोक्यावर बसली असेल तर तो योगायोग समजा,‘ असे गडकरींनी सांगताच गजानन पाटील या कथित ‘पीए’मुळे अडचणीत आलेल्या खडसेंचा संदर्भ लक्षात येऊन प्रचंड हास्यस्फोट झाला.

पुढे वाचा, शिवसेनेला ‘समज’ देणार !
बातम्या आणखी आहेत...