आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मला राज्यात नव्हे दिल्लीतच काम रस- नितीन गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘दिल्लीत जाण्यासाठी आपण इच्छुक नव्हतो. परंतु पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे अध्यक्षपद सांभाळले. देशाच्या राजधानीत काम करणे अवघड असले तरी पक्षाच्या आदेशानुसार आपण यापुढे तिथेच काम करणार असून राज्याच्या राजकारणात येण्यास इच्छुक नाही,’ असे स्पष्टीकरण भाजपचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. लोकसभेची निवडणूक नागपूरमधून लढवणार असल्याचा पुनरुच्चारही केला.


डी.एस.कुलकर्णी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘डीएसके गप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. निवेदक सुधीर गाडगीळ व ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. गडकरी म्हणाले, सध्या राजकारणात पद मिळवून सत्ता व पैसा मिळवणे या दुष्टचक्रात सर्व पक्षातील कार्यकर्ते अडकले असून ही दुर्दैवाची बाब आहे. राजकारण हे सत्ताकारणासाठी नसून सामाजिक-आर्थिक विकासाचे साधन आहे. कोलगेट प्रकरण, टू जी प्रकरणाचा पंतप्रधानांशी थेट संबंध आला. त्यामुळे यूपीए सरकार आयसीयूत दाखल झाले असून देशात सध्या काँग्रेस सरकारविरोधी वातावरण आहे.


उद्धव-राज यांच्यात पूल बांधण्याचे काम करतोय- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून मी खूप मानत होतो. उद्धव व राज यांनी एकत्र यावे व राज्यात शिवशाही नांदावी, अशी त्यांची इच्छा होती. राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी दोघांत पूल बांधण्याचे काम मी करत आहे.’


लोकसभा निवडणुकीत 200 जागा मिळतील- ‘क्रिकेट व राजकारण यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. जयललिता, मायावती, मुलायम, शरद पवार यांच्याशी माझे संबंध चांगले असून मी सर्वांचा मित्र आहे. लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत भाजपला 200 जागा मिळतील.’


मतविभाजनामुळे पराभव- ‘कर्नाटकात मतविभाजनामुळे भाजपचा पराभव झाला. 14 मे रोजी बंगळुरू येथे कर्नाटकातील आमदारांची बैठक बोलावली असून त्यात पराभवाची कारणमीमांसा होईल. बेळगावातील मराठी माणसावर भाजप सरकारने कधीच अन्याय केलेला नाही.’


सीबीआय भुक्कड- सीबीआय काँग्रेसची शक्ती बनली आहे. अनेक प्रकारांत हे उघड झाले आहे. म्हणून त्यांचे कार्यालय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हलवले पाहिजे. राष्‍ट्रवादी काँग्रेस -द्रमुक- मायावती- मुलायम सिंह यांनाही अडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस सीबीआयमार्फत करत आहे.


पंतप्रधान अर्थशास्त्रात नापास- आपला देश सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर असून चुकीची आर्थिक धोरणे, नेतृत्वाचे अपयश व चुकीचे भ्रष्ट शासन याला कारणीभूत आहे. देशाची सीमा असुरक्षित असून दैवी शक्तीवर शासन चालू आहे. पंतप्रधान देशाच्या आर्थिक नीतीच्या बाबतीत नापास झाले आहेत.