आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजेंद्र चौहान FTII मध्ये, विद्यार्थ्यांचा \'वापस जाओ\' नारा, पोलिसांसोबत संघर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जून 2015 मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच गजेंद्र चौहान यांनी हजेरी लावली. - Divya Marathi
जून 2015 मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच गजेंद्र चौहान यांनी हजेरी लावली.
पुणे- पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदाची सूत्रे अभिनेते गजेंद्र चौहान आज स्वीकारणार असल्याची कुणकुण लागताच एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी चौहानविरोधात आज सकाळी पुन्हा आंदोलन उभारले. \'गजेंद्र चौहान वापस जाओ\' अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गेटसमोर जोरदार आंदोलन केले. यादरम्यान पोलिस व विद्यार्थ्यांत जोरदार संघर्ष सुरु झाला. अखेर पोलिस बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले. मात्र, काही विद्यार्थी अद्याप आंदोलन करीत आहेत. 
 
एफटीआयआय नियामक मंडळाची आज प्रथमच बैठक होत आहे. या बैठकीसाठी चौहान पुण्यात आले आहेत. त्यांनी या बैठकीत प्रथमच सहभाग घेतला. जून ते नोव्हेंबर असे पाच महिने आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवले होते. मागील दोन महिन्यांपासून मुलांनी आंदोलन मागे घेतले होते मात्र आज चौहान पुण्यात येणार असल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन सुरु केले आहे. चौहान यांच्या अध्यक्षपदाला सुरुवातीपासूनच असणारा विद्यार्थ्यांचा विरोध कायम असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना गोंधळ, गडबड न करण्याबाबत कालच (बुधवारी) नोटिसा दिल्या होत्या.
 
आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता अशा 17 विद्यार्थ्यांना डेक्कन पोलिसांनी नोटिस बजावली होती. नोटिसीत म्हटले होते की, चौहान यांच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या हस्तकांकडून कोणतेही बेकायदा कृत्य घडल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा आशयाची ही नोटिस होती. या नोटिसीनंतर विद्यार्थ्यांचे पित्त आणखीच खवळले व आज सकाळी 9 वाजल्यापासून एफटीआयआयच्या गेटवर विद्यार्थी जमू लागले व चौहान यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आहेत.
 
दरम्यान, गजेंद्र चौहान यांचे स्वागत करण्यासाठी एफटीआयआय प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने जय्यत तयारी करताना भिंती रंगवल्या आहेत. सकाळी 10 वाजता चौहान यांचे एफटीआयआयमध्ये आगमन होणार होते. मात्र, परिस्थिती पाहून त्यांनी अद्याप हॉटेलमध्येच थांबणे पसंत केले. अखेर साडे आकराच्या सुमारास ते एफटीआयआयमध्ये दाखल झाले.
 
पोलिसांनी बळाचा वापर केला पण आमचा लढा सुरूच ठेऊ- आंदोलक

विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख विकास अर्स म्हणाला, आम्ही \'वुई शँल फाईट वुई शँल विन\'चे फलक हातात घेऊन आम्ही शांततामय मार्गाने सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलन करीत होतो. साडेनऊच्या सुमारास पोलिस आले व आम्हाला धक्काबुक्की करू लागले. आम्ही शांततेत आंदोलन करीत आहोत, ते आम्हाला करू द्या, तो आमचा अधिकार आहे असे सांगितल्यानंतरही पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना गाडीत बसवून अज्ञात स्थळी रवाना केले आहे. मात्र, आम्ही मागे हटणार नाही, आमचे आंदोलन सुरुच राहील असे विकास याने सांगितले. 
 
139 दिवस चाललेले आंदोलन मागे घेतले याबाबत छेडले असता विकास म्हणाला, आम्ही आंदोलन थांबवले होते, मागे घेतलेले नव्हते. आमचा चौहान यांच्यासह काही सदस्यांच्या निवडीला आक्षेप आहे, विरोध आहे व तो कायम राहील.
 
पुढे पाहा, आंदोलनाची क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...