पुणे - पुण्यातील वडकी येथे दलित
विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिस पथकांचा तपास सुरू आहे. मात्र सोमवारी दिवसभरात कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांची तीन पथके तपास करत असल्याचे पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) मनोज लोहिया यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
वडकी येथे शनिवारी सायंकाळी एका विवाहितेवर दोन व्यक्तींनी बलात्कार केला आणि अंधाराचा फायदा घेत ते फरार झाले. पीडित महिलेने व तिच्या पतीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने पोलिस तपास सुरू करण्यात आला. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत तपासात फारशी प्रगती झाली नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सुळे यांनी सोमवारी सकाळी पीडित महिलेच्या घरी भेट दिली.