पुणे, नागपूर - पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे डोंगर खचण्याची घटना तांत्रिकदृष्ट्या नैसर्गिकच आहे. अतिवृष्टीमुळे डोंगरावरील मातीचे वजन वाढले. उतारामुळे व संततधारेमुळे नुकसानीची तीव्रता वाढली, असा प्राथमिक निष्कर्ष जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (जीएसआय) पथकाने रविवारी काढला. डोंगरमाथ्यावरील भातशेतीमुळे डोंगर खचला नसल्याचे स्पष्टीकरणही त्यात नमूद आहे. दरम्यान, दुर्घटनेतील बळींची सख्या 106 झाली आहे.
पाऊस ओसरल्यावर व मदतकार्य आटोपल्यावर जीएसआय सविस्तर पंचनामा करील. त्याचा अहवाल सप्टेंबरमध्ये दिला जाईल, असे उपमहासंचालक डॉ. असीमकुमार साहा म्हणाले. हा डोंगर 250 मीटर उंच आहे. पडझड आणि चिखलामुळे त्यावर जाणे शक्य नाही. शिवाय स्थानिकांची मदत लागेल. त्यामुळे पुढील आठवड्यात जीएसआय काम सुरू करील, असे साहा म्हणाले.
नासाचा दावा फेटाळून लावला
भीमाशंकर भागात दरड कोसळण्याची घटना घडू शकते, असा इशारा अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने आदल्या दिवशी 29 जुलै रोजी साइटवर दिला होता. हवामान खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. तथापि, जीएसआयने मात्र हा दावा फेटाळून लावला. हिमालयात होणार्या भूस्खलनांचा इशारा नासाने दिल्याचे आठवत नाही. नेपाळ सीमेवर कोसी नदीच्या प्रकोपाचा इशारा का दिला नाही, असा सवाल साहा यांनी केला.