आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Bakery Blast Case: Himayat Baig Held Guilty Of Criminal Conspiracy, Sentencing On April 18

जर्मन बेकरी स्फोटात हिमायत बेग दोषी, पाच कलमांनुसार फाशी शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील उच्चभ्रू व परदेशींचे वास्तव्य असलेल्या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत इंडियन मुजाहिदीनने बॉम्बस्फोट घडवला होता. 17 जणांचे बळी घेणा-या या घातपातप्रकरणी अटक झालेला एकमेव आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग (31, रा.उदगीर, जि. लातूर) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.पी.धोटे यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. भादंवि कलम 302, 120 ब, 10 (अ) व (ब), बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायदा 16 (1)अ व सेक्शन 13 नुसार त्यास दोषी धरण्यात आले. कलमानुसार फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असून याबाबत 18 एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहे. 13 फेब्रुवारी 2010 रोजी हा स्फोट झाला होता.


बेगविरुद्ध 2607 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याला 302 (खुन करणे), 307 (खुनाचा प्रयत्न), 153 (देशाविरुध्द युध्द पुकारणे), 435 (मालमत्ता नुकसान), 120 ब (गुन्ह्याचा कट रचणे), 474 (बनावट कागदपत्रांचा वापर), बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायदा सेक्शन 10, 13, 16, 18 व 20 नुसार दोषी ठरवले आहे. आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यावर मत मांडण्यासाठी 18 एप्रिल पर्यंत वेळ देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.गुन्हे सिध्द झाले
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने बेगला दोषी धरले असून त्याच्यावरील सर्व गुन्हे सिध्द झाले आहेत. न्यायालयाने त्यास दोषी ठरवताना पाच कलमानुसार उच्च दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायद्यानुसार त्याला दोषी ठरवण्यात आले ही महत्त्वाची बाब आहे.
राजा ठाकरे, विशेष सरकारी वकील

उच्च न्यायालयात जाणार
यासीन भटकळ व मोहसीन चौधरी यांनी स्फोटाचा कट श्रीलंकेत रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बेग मुख्य कटात सामील नसून त्याने बेकरीत बॉम्ब ठेवला नाही. घटनेच्या दिवशी तो पुण्यात नव्हता. यावर आम्ही सहा साक्षीदार सादर केले. त्यामुळे निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार आहोत.
ए.रहमान व कायनाथ शेख, बचाव पक्षाचे वकील


पोलीसांचे एकत्रित यश
स्फोटाचे तत्कालीन तपास अधिकारी विनोद सातव म्हणाले, मुंबई-पुणे एटीएसचे अधिकारी, गुन्हे शाखेचे विविध वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एटीएस प्रमुख, पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणात विशेष परिश्रम घेतले. हिमायत बेग दोषी ठरणे हे सांघिक कामाचे यश आहे.

न्यायालयात पोलीस, प्रसारमाध्यमांची गर्दी
पुण्यातील पहिल्या दहशतवादी घटनेचा निकाल सव्वातीन वर्षात लागला. राष्‍ट्रीय स्वरुपाच्या या घटनेचे लक्षात घेऊन विविध वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन सकाळपासूनच न्यायालयाच्या गेटबाहेर उभ्या होत्या. 15 ते 20 कॅमेरे वकीलांची प्रतिक्रिया घेण्यास सज्ज होते. न्यायालयाच्या आवारात 150 ते 200 पोलीसांचा विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयात सुनावणी ऐकण्यासाठी पत्रकार व पोलीसांनी गर्दी केली होती.