आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Bakery Blast: Himayat Baig Gets Death Sentence

जर्मन बेकरी स्फोट: हिमायत बेगला फाशीची शिक्षा, कुटुंबीय हायकोर्टात अपील करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन तसेच लष्कर-ए-तोयबाशी संबंधित अतिरेकी मिर्झा हिमायत इनायत बेग (31, रा.उदगीर) याला विशेष कोर्टाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली.

13 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 17 लोकांचा मृत्यू झाला, तर 64 जण गंभीररीत्या जखमी झाले होते. गुरुवारी दिवसभर चाललेल्या युक्तिवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे स्पष्ट करून बेगवर सिद्ध झालेल्या 16 आरोपांपैकी पाच प्रकरणांत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे सांगितले. गेल्या 15 एप्रिल रोजी कोर्टाने हिमायत बेगला हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी षड्यंत्रासह इतर गंभीर गुन्ह्यांत दोषी ठरवले होते. दरम्यान, बेगचे वकील ए. रहेमान यांनी निकालाविरुद्ध हायकोर्टात अपील करण्यात येईल, असे स्पष्ट केले. बेगच्या कुटुंबीयांनी अपील करण्यासाठी जमायत उलेमा हिंद या सेवाभावी संघटनेची मदत मागितली आहे.

हे आरोपी अजूनही फरार : या बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत केवळ हिमायत बेग यालाच अटक होऊ शकली. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या मोहसीन चौधरी, यासीन भटकळ, रियाज भटकळ, इकबाल भटकळ आणि फय्याज कागजी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

क्रूरकर्म्याला रडू कोसळले, चक्करही आली
शिक्षा जाहीर होताच बेग ढसाढसा रडला. साक्षीदाराच्या पिंज- यातून बाहेर पडताना चक्कर आली. सुनावणीनंतर कोर्टाच्या आवारातून नेले जात असताना तो चक्कर येऊन रस्त्यातच पडला. निकालानंतर पुणे बार कौन्सिलच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटण्यात आले.

कोर्टाचा निष्कर्ष
० जर्मन बेकरी बॉम्बस्फोट कटात बेग सहभागी होता. स्फोटात देशी तसेच परदेशी लोकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख मोठे आहे.
० आरोपींना स्फोटकांचा वापर माहिती होता. मोठी जीवितहानी होणार याची कल्पना होती. म्हणून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे हे कृत्य मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे.
० परिस्थितिजन्य पुराव्यानुसार हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे. आरोपी दहशतवादी विचारांनी प्रेरित आहे. त्याच्यात सुधारणा होण्याची कोणतीच चिन्हे नसून समाजाला धोका आहे. त्यामुळे फाशीच योग्य ठरते.

उदगीर कनेक्शन
बेग लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये सायबर कॅफे चालवत असल्याचे आढळून आल्यावर एटीएसने छापे टाकून 1200 किलो स्फोटके जप्त केली होती. वापरलेला बॉम्ब बेगच्या सायबर कॅफेतच तयार झाला.

बीडमध्ये बंदोबस्त वाढवला
बीड : दोषी हिमायत बेग याचे कुटुंबीय बीडमध्ये राहतात. फाशी सुनावल्यावर हिमायतचा भाऊ तारेक याने आपल्या भावाचा जर्मन बेकरी स्फोटात हात नसल्याचा दावा केला. या निकालाविरुद्ध हायकोर्टात दाद मागणार असल्याचेही त्याने दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड शहर तसेच ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

वडिलांचे जिलेबी दुकान बंद
हिमायत बेगचे वडील इनायत यांचे बीडमधील कारंजा भागात असलेले जिलेबीचे दुकान गुरुवारी सकाळपासूनच बंद होते. कोर्ट काय शिक्षा सुनावते याकडे बेग कुटुंबीयांचे लक्ष लागले होते. शिवाय इनायत बेग यांची तब्येत सकाळपासून बिघडली. कामगारही दुकानाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे दुकान दिवसभर बंद ठेवावे लागल्याचे तारेक बेग म्हणाला.