आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घाशीराम कोतवाल’ बंगाली भाषेत येणार, कोलकाता येथील ‘चेतना ग्रुप’ सादर करणार प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी ४५ वर्षांपूर्वी लिहिलेले, डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित आणि पं. भास्कर चंदावरकर यांच्या संगीताने, कृष्णदेव मुळगुंद यांच्या नृत्यदिग्दर्शनाने गाजलेले आणि विदेशातील रंगभूमीवरही वाखाणले गेलेले ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक प्रथमच बंगाली भाषेत अनुवादित झाले असून बंगाली कलाकारांकडून बंगाली भाषेतला या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.   

कोलकाता येथील युवा रंगकर्मींचा ‘चेतना ग्रुप’ बंगालीतून घाशीराम कोतवाल सादर करणार आहे. या ग्रुपचा प्रवर्तक युवा रंगकर्मी सुजन मुखोपाध्याय याने ही माहिती दिली. ‘घाशीराम’ का करावेसे वाटले, या प्रश्नावर सुजन म्हणाला,‘विजय तेंडुलकरांनी या नाटकात सत्तास्थाने, अधिकारपदे, सत्ता गाजवणारे, गाजवू इच्छिणारे यांच्याविषयी जे ‘विधान’ केले आहे ते समकालीन आहे, असे मला वाटते. मी अगदी लहानपणी मूळ मराठी नाटकाचा प्रयोग पाहिला होता. तो पाहून मी अतिशय प्रभावित, अचंबित झालो होतो. मात्र, इतक्या वर्षांत या अप्रतिम नाट्यकृतीचे बंगालीमध्ये भाषांतर कसे काय झाले नाही याचे आश्चर्य मला आजही वाटते. मी या नाटकामुळे झपाटून गेलो असल्याने अवंती चक्रवर्ती आणि मी स्वत:च अनुवादाचे काम केले. घाशीरामचे टेक्स्ट ‘म्युझिकल’ असल्याने आणि समूहाला पूर्ण वाव असल्याने मला बंगाली रंगभूमीवरील अनेक युवा, नव्या रंगकर्मींना या उपक्रमात सहभागी करून घेता आले.’   

पाठोपाठ होणार प्रयोग   
पुण्यात ६ मार्चला दुपारी साडेबारा वाजता प्रथम बालगंधर्व रंगमंदिरात मराठी घाशीराम कोतवाल नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. पाठोपाठ साडेपाच वाजता बंगाली भाषेतील घाशीराम कोतवाल सादर होईल, अशी माहिती आयोजक मेघराज राजेभोसले यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...