पुणे - मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात मराठी गझलचा प्रथमच समावेश होत आहे. आजवर बाजूला टाकलेली गझल पिंपरीत पहिल्याच दिवशी रसिकांच्या भेटीस येणार आहे. ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे ही मैफल रंगवणार आहेत. या निमित्ताने साहित्य सारस्वतांनी गझलची अस्पृश्यता संपवल्याची भावना रसिकांच्या मनात आहे.
मराठी साहित्य संमेलनाला प्रदीर्घ इतिहास आहे. या काळात मराठी साहित्याच्या विविध आकृतीबंधांविषयी संमेलनांमध्ये चर्चा, परिसंवाद, व्याख्याने, मुलाखती, अभिवाचन आदी घडले आहे. मात्र, गझलसारख्या मराठी साहित्यात आता रुळलेल्या आकृतीबंधाचा समावेश आजवर संमेलनात केला गेला नव्हता. ही त्रुटी पिंपरीमधील संमेलनात दूर होणार आहे.
गझलशी ज्यांचे नाव एकरूप झाले आहे, असे ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे संमेलनातील पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजता मराठी गझलांचा नजराणा रसिकांसमोर ठेवणार आहेत. “गझल हा काव्यप्रकारच नव्हे, तो कृत्रिम प्रकार आहे, असे आक्षेप आजवर घेतले जात होते. गझल म्हटले की नाक मुरडले जात असे, असा काळ मी अनुभवला आहे. गेली ४२ वर्षे सातत्याने गझल गायनातून गझल पोहाेचवण्याची साधना मी करत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी गझलसारखा अत्यंत सुंदर आणि सशक्त काव्यप्रकार सादर करण्याची संधी मला मिळाली आहे, याचा आनंद वाटतो, अशी भावना भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली.