आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमक्कडांचा मेळावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात मुंबईत गिरीमित्र संमेलन भरले होते. या संमेलनात मेघालय, पश्चिम बंगाल आणि अगदी अनपेक्षित अशा हैदराबाद इथूनही गिरीमित्र आले होते. पण खेदाची बाब म्हणजे, महाराष्ट्रातील मित्रांमध्ये मुंबई पुण्याकडचे सोडले तर इतर भागातील गिरीमित्र अभावानेच होते. मनस्वी घुमक्कडांचा हा मेळावा होता.
त्यामध्ये सहभागी झालेल्या रत्नागिरीच्या एका गटाने गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यावरच्या दुरुस्त्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी पुरातत्त्व खात्याचा कान पकडून कामाला जुंपले होते. कुणी शिवाजीच्या मावळ्यांप्रमाणे दोराचा वापर करून अनेक दुर्गम उभे कडे चढण्याचा विक्रम केलेला होता. किशोरी आमोणकर या विख्यात शास्त्रीय गायिकेचा मुलगा बिभास आमोणकर याने गाण्याकडे पाठ फिरवून पक्षीनिरीक्षण, वनस्पतीशास्त्र, छायाचित्रण यांसारख्या छंदांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने अनेक वयोगटातील गिरीप्रेमींमध्ये आपले ज्ञान वाटण्याचा छंद जोपासला आहे. आनंद पाळंदे यांच्या गडकिल्ल्यांची ओळख करून देणा-या पुस्तकांवरून स्फूर्ती घेऊन पुण्याच्याच प्रा. प्र. के. घाणेकरांनी घुमक्कडांसाठी गिरीभ्रमणाच्या सर्वांगाची ओळख करून देणारी तब्बल 56 पुस्तकांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. ‘आडवाटेवरचा महाराष्ट्र’, ‘डोळस भटकंती’, ‘इतिहास घडविणा-या वनस्पती’, ‘सहली पावसाळ्यात भिजायच्या’ या केवळ वानगीदाखल दिलेल्या नावांवरून घाणेकरांच्या चौफेर दृष्टीची कल्पना यावी. पुण्याच्या ‘गिरीप्रेमी’ या संघटनेच्या आठ बहाद्दरांनी एकाच मोहिमेत एकाच दिवशी ‘एव्हरेस्ट’ या जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई करण्याचा हिमालयीन पराक्रम केला. त्यांचेही खूप कौतुक झाले. एका गटाने तर कुठल्याही यादीत नसलेला ‘लोक्जा’ नावाचा किल्ला शोधून काढल्याचे या संमेलनात उपस्थितांना कळले. अर्थात, या संमेलनाचे खरे आकर्षण ठरला तो इतर राज्यातील गिर्यारोहकांचा सहभाग. अतिपूर्वेला असलेल्या, मेघालयातून लिंगडोह नावाचा कमालीचा उत्साही गिर्यारोहक आला होता. त्याने आजवर हिमालयातील 20 हजार फुटांच्या वरची 15 शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्याने सर्वांना आवाहन केले की, तुम्ही तिकडे या. तुम्हाला मेघालयाचे वैशिष्ट्य असलेल्या असंख्य गुहा बघायला मिळतील. त्यातल्या काही जागतिक कीर्तीच्या गुहांबरोबर स्पर्धा करू शकतील अशा आहेत. ब-याच गुहा असंशोधित, अस्पर्शित आहेत. यानंतर समोर आले पश्चिम बंगालचे गिरीप्रेमी. बंगालमध्ये या प्रकारची चळवळ बरीच वर्षे असल्याचे ज्ञात होते. त्यांनीही आपल्या मोहिमांबद्दलचे सादरीकरण केले.
यानंतर आला हैदराबादचा ग्रुप. त्यांनी केलेल्या सादरीकरणाने सर्वांच्या टोप्याच उडवल्या. हैदराबाद हे ‘आयटी सिटी’ तिथल्या या तरुण पिढीचे आयुष्य म्हणजे, सोमवार ते शुक्रवारपर्यंत मान मोडेपर्यंत काम करायचे. अली नावाच्या एका तरुणाने त्यातून आपला मार्ग शोधला. प्रारंभी काही जणांना त्याने डोंगरात चलण्याचे आवाहन केले. पण कुणाचाही प्रतिसाद येईना म्हटल्यावर हा पठ्ठा उठला आणि थेट हिमालयात अन्नपूर्णा बेसकॅ पला जाऊन आला.
त्याचे विलक्षण अनुभव ऐकून आणखी काही लोकांना स्फूर्ती आली आणि त्यांनी ‘घॅक’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे सभासदत्व मिळण्यासाठी कसलीही प्रवेश फी नाही. फॉर्म भरण्यासाठी कसलीही कागदावरची लिखापढी नाही. सर्व काही ऑ नलाइन. 2009मध्ये सुरू झालेल्या या अ‍ॅडव्हेंचर क्लबची सभासद संख्या आज 8500च्या वर गेली आहे. पुढील काही वर्षांत ती दहा लाखांच्या वर जाईल, अशी अटकळ आहे.
शहराच्या आजूबाजूला डोंगराचे अस्तित्व नसताना हैदराबादेत सुरू असलेले गिर्यारोहणातील इतके प्रकार मुंबई- पुण्याकडच्या घुमक्कडांना अनाकलनीय होते. या संस्थेत कुणीही प्रमुख नाही. त्यांनी आपल्यातीलच स्वयंसेवक निवडून लष्कराच्या मदतीने प्रथमोपचारापासून अगदी लाईफगार्ड सकट सर्व विभागांसाठी 90 प्रशिक्षक तयार केले. सर्व विनावेतन काम करतात भांडणतंट्यांना वाव नाही. त्यांच्या पेशामधून भरपूर पैसे मिळत असल्यामुळे हे शक्य होत असावे. याच पैशाच्या आधारे त्यांनी गिर्यारोहण इतर प्रकारांसाठीची अद्ययावत सामग्री जमा केली आहे. या गिरीप्रेमींचा प्रयत्न आहे की, सभासदांच्या कुटुंबीयांनाही सहभागी व्हावे. त्यात त्यांना चांगले यश येत आहे.
त्या संमेलनात ‘समाजाचा गिर्यारोहणाबद्दलचा दृष्टिकोन’ हा एक महत्त्वाचा परिसंवाद झाला. शिवाय सामान्य लोकांपर्यंत या खेळप्रकाराची माहिती पोहोचवायची कशी? असा प्रश्नही विचारला गेला, पण त्याचा एक मार्ग ‘गिरीप्रेमी’ने दाखवला. ‘गिरीप्रेमी’ संस्थेने मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निधीसाठीचा फार मोठा भाग पुणेकरांकडून आणि परिघाबाहेरच्या काही लोकांकडून जमा केला. त्यासाठी त्यांनी दीड-दोन वर्षे वेगवेगळे उपक्रम करून सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यात जनसामान्यांनी पन्नास रुपयांपासून पाच लाखापर्यंत वैयक्तिक देणग्या दिल्या. देणगी देणा-यांमध्ये श्रीमंतांबरोबरच रिक्षावाले, हमाल, झोपडपट्टीतले लोकही होते. त्यांच्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या बजेटपैकी सुमारे ऐंशी टक्के निधी सामान्य लोकांमधून जमा झाला होता, आता परिघाबाहेरच्या मंडळींनीही गिर्यारोहणातला थरार उमजून घेण्यासाठी डोंगराच्या दिशेने पावले टाकायला हवीत.