आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायगड राष्ट्रीय वारसास्थळ व्हावे, ही युवराजांची इच्छा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - युनेस्को जाहीर करत असलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या (वर्ल्ड हेरिटेज साइट) धर्तीवर भारत सरकारनेही राष्ट्रीय वारसास्थळांची (नॅशनल हेरिटेज साइट) घोषणा करावी, अशी संकल्पना कोल्हापूर गादीचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली आहे. दुर्गराज रायगडाला राष्ट्रीय वारसास्थळाचा मान दिला जावा, अशी त्यांची इच्छा आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक असलेल्या युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. यंदा शिवराज्याभिषेक दिनाचे ३४२ वे वर्ष आहे. यानिमित्ताने युवराज संभाजीराजे ‘दिव्य मराठी'शी बोलत होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा- वेरूळ लेणी (औरंगाबाद), छत्रपती शिवाजी टर्मिनस, एलिफंटा गुहा लेणी (दोन्ही मुंबई) या तीन स्थळांचा सध्या समावेश आहे.
छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड हे केवळ मराठी माणसांचे नव्हे, तर देशाचे स्फूर्तिस्थान होऊ शकते. यासाठी शिवरायांचा इतिहास येथे जिवंत केला पाहिजे. येथील ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार करायला हवा. मात्र, हा किल्ला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांच्या परवानगीविना रायगडावर कोणतीही विकासकामे करता येत नाहीत, असे संभाजीराजे म्हणाले. "सरकारला रायगडावर काही करायचे नसेल, त्यांच्याकडे निधीची कमतरता असेल तर त्यांनी ते तरी स्पष्टपणे सांगायला हवे. रायगडासाठी कोट्यवधी रुपये रयतेतून उभे राहतील. तसे अनेक प्रस्ताव माझ्याकडे येत आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

फाइव्ह मॉडेल फोर्ट
अरबी समुद्रात शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार २८०० कोटी रुपयांची योजना आखत आहे. त्याला माझा आक्षेप नाही, पण याच सरकारने आठशे कोटी रुपये जरी बाजूला काढले, तरी शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करता येईल. शासनाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा. सरकारची वाट न पाहता मी ‘फाइव्ह मॉडेल फोर्ट'चा उपक्रम आखतोय. रायगड, राजगड, पन्हाळा, पुरंदर आणि सिंधुदुर्ग या जलदुर्गासह पाच किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

मतांपुरते शिवप्रेम?
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी जनमानसातील स्थान लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत रायगडाला आवर्जून भेट दिली. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने शिवरायांचे नाव वापरले. मोदी आता पंतप्रधान आहेत. रायगडासाठी निधी उपलब्ध करून देणे किंवा रायगडाला राष्ट्रीय वारसास्थळाचा दर्जा देण्यास मोदींना कोणी विरोध करण्याची शक्यता नाही. मात्र, या निर्णयासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्ती ते दाखवणार का, हा प्रश्न आहे. अन्यथा केवळ मते मिळवण्यासाठी मोदींचे शिवप्रेम उफाळून आल्याचा ठपका त्यांच्यावर येऊ शकतो.

सरकार काय करू शकते?
>भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानग्यांचा अडसर दूर करून विकासकामांना गती देणे.
>राष्ट्रीय वारसास्थळ जाहीर करून रायगड विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.
>युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये रायगडाची शिफारस करणे.
रायगडावर "कॅबिनेट' घ्या
शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला महाराष्ट्राचे कोणतेच मुख्यमंत्री रायगडावर उपस्थित राहत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा पायंडा पाडावा. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मंत्रिमंडळाची एक बैठकसुद्धा त्यांनी शिवरायांच्या राजधानीत येऊन घ्यावी. म्हणजे रायगडावरील समस्या दूर करण्याची निकड राज्यकर्त्यांना जाणवेल.’
छत्रपती संभाजीराजे