आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या राहणीची जाहिरातबाजी कशाला? - मनोहर पर्रिकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- “साधी राहणी हा माझ्या चारित्र्याचा भाग आहे. त्यामुळे मी त्याची जाहीरात करीत नाही. साधं राहणीमान असलेले चांगले असते पण तेवढ्या एका गुणामुळेच कोणी चांगले काम करू शकतो असे नाही. त्यामुळे कामावर परिणाम होऊ न देता गरजेप्रमाणे साधी राहणी ठेवली पाहिजे,” असे मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुण्यात व्यक्त केले.
मुख्यमंत्री असूनही साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेल्या पर्रिकर हे पुण्यातील भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार प्रदीपदादा रावत, प्रदेश प्रवक्त्या शायना एन. सी. अनिल शिरोळे उपस्थित होते.
मोदींच्या गुजरात मॉडेलविषयी विचारले असता पर्रिकर म्हणाले, “भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली आहे. भाजपशासित सर्वच राज्यांमध्ये चांगला विकास होत आहे. गुजरातप्रमाणेच गोवा, मध्य प्रदेशात, राजस्थानमध्ये विकासाचे मॉडेल राबविले जात आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये असल्यामुळे त्यांच्या गुजरात मॉडेलची चर्चा अधिक होते, मात्र ते मॉडेल भाजपचेच आहे.”
मोदी यांचे सरकार आल्यास कोणते मंत्रीपद घेणार या प्रश्नाचे उत्तर देताना पर्रिकर म्हणाले, मंत्रीमंडळात कोण-कोण मंत्री असावेत याचा निर्णय पंतप्रधान घेतात. मला गोव्याच्या जनतेने निवडून दिले आहे त्यामुळे मी गोव्यामध्येच ठीक आहे. केंद्रातील मोदी सरकारला काही मदत करू हवी असेल तेव्हा मी नक्की करेन.
गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास व्यक्त करून पर्रिकर म्हणाले, “काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याक समाजाचा वापर व्होट बँकसाठी केला आहे. गोव्यातील अल्पसंख्याक भाजपबरोबर आहेत. 14 कॅथलिक आमदारांपैकी 10 जण भाजपसोबत आहेत. माझ्याएवढेच मोदीसुद्धा सेक्युलर आहेत.”