आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप जोरात; धरणे भरात, राज्यातील 308 तालुक्यांत सरासरी गाठली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मान्सूनने महाराष्ट्र व्यापून गुरुवारी 50 दिवस झाले. या कालावधीत राज्यातील 308 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली तर फक्त 50 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. दमदार पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाने जोर धरला असून 91 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. एकावन्न टक्क्यांच्यापुढे गेलेल्या धरणसाठ्यातही नित्य वाढ होत आहे. यंदा चार जुनला मान्सून तळकोकणात दाखल झाला होता. त्यानंतरच्या दोन दिवसांत संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले होते.

राज्याच्या सर्व भागात सध्या मान्सून सक्रिय असून पुढील दोन दिवसांत सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, बंगाल किनारपट्टीच्या भागात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले अहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेचे कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर सरकले आहे. राज्यात मान्सून सक्रिय राहण्यास ही दोन्ही क्षेत्रे अनुकूल आहेत. त्यामुळे येत्या 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात पेरण्या पूर्ण
कोकण आणि विदर्भात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने खरीप पेरण्या मंदावल्या आहेत. कोकणात आतापर्यंत 61 टक्के तर नागपूर विभागात 70 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. तुलनेने कमी पाऊस असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पेरण्या वेगात सुरू आहेत. नाशिक विभागात 92 आणि पुणे विभागात 90 टक्के पेरण्या झाल्या आहेत. औरंगाबाद आणि लातूर विभागात तर सरासरीपेक्षा अधिक पेरण्या यंदा झाल्या आहेत. दोन्ही विभागातील पेरण्यांची टक्केवारी अनुक्रमे 112 आणि 101 असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. राज्यात आतापर्यंत 131.31 लाख हेक्टर पेरण्या आटोपल्या आहेत.

गंगापूर धरणात 66 टक्के पाणी
नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 8 हजार 228 मिमी पाऊस झाला. सर्वांधिक पाऊस हा इगतपुरी तालुक्यात 2 हजार 10 मिमी, पेठ तालुक्यात 1 हजार 204 आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात 1 हजार 64 मिमी झाला. जिल्ह्यातील गंगापूर धरण 66 टक्के तर भावली धरण 100 टक्के भरले आहे. शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा ‘आयएमडी’चा अंदाज आहे.

सांगलीत पुरात मुलगा वाहून गेला
सांगली । कृष्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा गुरुवारी पुरात वाहून गेला. ही घटना सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे घडली. दरम्यान, कोयना धरणातूनही गुरुवारीही 62 हजार क्युसेकने विसर्ग सुरू राहिल्याने कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. माळवाडी येथील निखील पुरुषोत्तम पटेल हा दहावीतील विद्यार्थी सकाळी खासगी क्लाससाठी भिलवडी येथे गेला होता. क्लासहून परतत असताना वाटेतील पुलावर तो कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी पाहण्यासाठी थांबला. पुलाच्या कठड्यावर उभा राहून तो पात्रातील पाणी पाहत असताना पाय घसरून तो नदीच्या प्रवाहात पडला आणि वाहून गेला.


सरासरीपेक्षा कमी पावसाचे तालुके
कोकण : जव्हार, विक्रमगड (ठाणे), सुधागड (रायगड), वैभववाडी (सिंधुदुर्ग)
मध्य महाराष्ट्र : वेल्हे (पुणे), द. सोलापूर, सांगोला, मंगळवेढे (सोलापूर), मेढा, पाटण, कोरेगाव, माण-दहिवडी (सातारा), हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, आजरा, चंदगड (कोल्हापूर), नेवासा (नगर)
उत्तर महाराष्ट्र : कळवण, सुरगणा, येवला, चांदवड, त्र्यंबकेश्वर, देवळी (नाशिक), रावेर, जामनेर (जळगाव), साक्री (धुळे), शहादा, नवापूर, तळोदा (नंदूरबार)
मराठवाडा : गंगापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री (औरंगाबाद), बदनापूर, घनसावंगी (जालना), धारुर, शिरुर कासार (बीड), परांडा, भूम, कळंब, उमरगा, वाशी (उस्मानाबाद), नायगाव (नांदेड), मानवत (परभणी)
विदर्भ : भटुकली (अमरावती), कळम, राळेगाव (यवतमाळ), तुमसर (भंडारा)