आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुजनांच्या न्यायाची लढाई चालू ठेवणे हीच मुंडेंना श्रद्धांजली– देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बहुजनांना व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठीची दिवंगत लोकनेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांची लढाई पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात सांगितले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार अनिल शिरोळे, महापौर चंचला कोद्रे, खासदार रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार, खासदार संजय काकडे, प्रदीप रावत, आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार दिप्ती चौधरी, आमदार विनायक निम्हण, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, आरआरएसचे बापू घाटपांडे, रवींद्र घाटपांडे, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड, काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे व पत्रकार गोविंद घोळवे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्य माणासासाठी काय करता येईल याचा गोपीनाथ मुंडे यांनी सदैव विचार केला. सामाजिक समतेचे तत्व त्यांच्या मनात रुजलेले होते. सामाजिक बांधिलकीसाठी त्यांनी राजकीय किंमतही मोजली. त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला पितृत्व दिले. ज्या तत्त्वांचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला त्यानुसार आता पुढे चालले पाहिजे. बहुजनांना- सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठीची त्यांची लढाई पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली आहे. गोपीनाथ मुंडे हे अद्वितीय नेतृत्व होते. दुसरे गोपीनाथ मुंडे होणे नाही. त्यांच्या निधनाने अपार दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे मुंडे ज्या धिरोदात्तपणे सामोर्‍या गेल्या, जे आश्वासक नेतृत्वगुण त्यांनी दाखवले ते पाहता गोपीनाथ मुंडे यांची जागा पंकजाच घेऊ शकतात.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध गोपीनाथ मुंडे यांनी रणशिंग फुंकले व त्या संघर्षातून त्यांचे नेतृत्व सिद्ध झाले. त्यांनी नेहेमीच भटक्या विमुक्तांना, ओबीसींना, दलितांना, शोषितांना न्याय मिळावा यासाठी धडपड केली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला.

विनोद तावडे यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला बहुजन चेहरा दिला. ती ओळख कधीही पुसली जाणार नाही याची आयुष्यभर काळजी घेऊ. त्यांचे नेतृत्व समाजातील तळागाळातील माणसाशी जोडलेले होते. सर्वसामान्य माणूस संकटात सापडला की, अशा प्रसंगी ते तातडीने धावून जात. रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, बाळा नांदगावकर, चंचला कोद्रे, अनिल शिरोळे, बापूसाहेब घाटपांडे, रविंद्र घाटपांडे, अंकुश काकडे, महादेव जानकर, शशिकांत सुतार व गोविंद घोळवे यांची यावेळी भावपूर्ण भाषणे झाली.