आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Governor Of Maharashtra K Sankaranarayanan In Pune

कायद्याचे पालन, शिक्षणाचा प्रसार महत्त्वपूर्ण - राज्यपाल शंकरनारायणन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश विकासाकडे वाटचाल करत असताना कायद्याचे पालन करणे व समाजात शिक्षणाचा प्रसार करणे महत्त्वपूर्ण आहे, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठाच्या विधी विभागाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. माणिक जाधव, विधी विभागप्रमुख डॉ. टी. एस. एन. शास्त्री उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, खासगी विद्यापीठ विधेयक प्रलंबित असून ते लवकर अस्तित्वात येईल. या विद्यापीठात आरक्षणाचा प्रस्ताव आपण पाठवणार आहोत. उच्च शिक्षण विधेयकातील तरतुदींची दीर्घकालीन अंमलबजावणी करण्याची असल्याने या तरतुदींची पडताळणी केली जात आहे. चीनसारखा भारत का विकसित होऊ शकत नाही, यावर राज्यपाल म्हणाले, भारतीय नागरिक पंतप्रधान, प्रशासन, कायदे यावर टीका करू शकतो. माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करून एखादी माहिती मिळवू शकतो; पण तशा प्रकारची कोणतीच व्यवस्था चीनमध्ये अस्तित्वात नाही. राज्यातील शिक्षणाची व्यवस्था चांगली असल्यामुळे पुण्यात 18 हजार परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विनाअनुदानित लॉ स्कूल - कुलगुरू डॉ. गाडे म्हणाले, विद्यापीठात नॅशनल लॉ स्कूल बनवण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे; परंतु परवानगी देताना अनुदान न देण्याची अट घातली आहे. त्यामुळे विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून 2013 पासून हे लॉ स्कूल सुरू करण्याचा विचार केला जाईल. सध्या विद्यापीठाचा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असून ही परिस्थिती पुढील पाच वर्षांत बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सायन्स टेक्नॉलॉजी विभाग हा विद्यापीठाचा भाग असून ती स्वतंत्र संस्था नाही. या प्रस्तावास माझा विरोध नसून या विभागाच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचे गाडे म्हणाले.