आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Growth In Maharashtra's Success Percentage In UPSC

‘यूपीएससी’ परीक्षेतील मराठी टक्का वाढला, आयएएसच्या रँकिंगमध्ये मात्र घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यंदा सुमारे शंभर मराठी विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्तीर्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, ‘रँकिंग’ घसरल्याने ७-८ पेक्षा जास्त मराठी विद्यार्थी ‘आयएएस’मध्ये (भारतीय प्रशासकीय सेवा) जाऊ शकणार नाहीत, हे निश्चित झाले आहे.

महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवणारी अंजली नरवणे देशपातळीवरच्या यादीत ७८ व्या क्रमांकावर आहे. यावरून यंदाच्या यादीतील मराठी रँकिंगचा अंदाज येतो. अलीकडच्या काही वर्षांतले हे सर्वात खालचे ‘रँकिंग’ आहे.

मराठी विद्यार्थ्यांच्या कामगिरीसंदर्भात चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, ‘यूपीएससी’त झळकणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या समाधानकारक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत देशात पहिल्या शंभरात येणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या पाहता यंदा त्यात घट झाली आहे. शतक गाठल्याचा आनंद आहे; पण पहिल्या शंभरात कमी असल्याची खंतही आहे. गेल्या सात-आठ वर्षांत मराठी विद्यार्थी देशपातळीवर दहाव्या, पंधराव्या, तिसाव्या अशा क्रमांकाने उत्तीर्ण होत होते. अर्थातच अबोलीच्या यशाचे कौतुक नक्कीच आहे.

“एखाद्या वर्षी रँकिंग घसरले म्हणजे मराठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर लगेच शंका घेण्याचे कारण नाही. एखादा निकाल असा लागतो. परंतु महाराष्ट्रातील मुले जातील तेथे चमकदार कामगिरी करतातच. रँकिंग पाहता सात-आठ विद्यार्थी ‘आयएएस’, तसेच साधारण तितकेच ‘आयपीएस’ होतील असे दिसते,” असे धर्माधिकारी म्हणाले.

युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, “यंदा आपण शंभरी ओलांडतोय याचे कौतुक करावे लागेल. महाराष्ट्रातील पहिला क्रमांक मुलीने पटकावला याचाही विशेष आनंद आहे. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मराठी माध्यमातील मुलांचे प्रमाण कमी आहे. मात्र ७-८ विद्यार्थी नक्कीच आयएएस होतील.”

स्पर्धा उत्तर प्रदेशाशी
‘यूपीएससी’मध्ये महाराष्ट्राची स्पर्धा उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांशी आहे. यंदाच्या यादीत उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन्ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. देशपातळीवर या दोन राज्यांमधल्या उत्तीर्णांची संख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याचे दिसते आहे.

पाच सेवांनाच ८० टक्के विद्यार्थ्यांची पसंती
आयएएस (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस), आयपीएस (इंडियन पोलिस सर्व्हिस), आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस), आयआरएस-आयटी (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस-इन्कम टॅक्स) आणि आयआरएस-कस्टम (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस-कस्टम) या पाच सुपर क्लास-वन सेवा मानल्या जातात. या पाच सेवांची संख्या सर्वाधिक असल्याने ‘यूपीएससी’मधले ऐंशी टक्के विद्यार्थी या पाच सेवांमध्ये सामावले जातात. ‘यूपीएससी’तल्या ‘रँकिंग’नुसार या पाच सेवांमधे विद्यार्थी सामावून घेतले जातात.