आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधिलकी जपणाऱ्या "ज्ञानेश्वर'चा अमृतमहोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दुसऱ्या महायुद्धाच्या होरपळीत जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असताना सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणाऱ्या ‘प्रभात’चा ‘संत ज्ञानेश्वर’ हा संतपट प्रदर्शित झाला होता. देश-विदेशात या चित्रपटाने अनेक विक्रम घडवले. या ऐतिहासिक घटनेला १८ मे रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
‘प्रभात फिल्म कंपनी’चा संत ज्ञानेश्वर हा बोलपट १८ मे १९४० रोजी पुणे आणि मुंबईत एकाच वेळी मराठी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता. सलग ३६ आठवडे हाऊसफुल्ल गर्दी खेचून या चित्रपटाने कमाईचाही विक्रम केला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या झळांनी होरपळणाऱ्या जगात शांतीचा संदेश देणारा, विश्वकल्याणाचा मानवतेचा पुरस्कार करणारा हा चित्रपट विशेष वाखाणला गेला.
या चित्रपटाविषयी ‘प्रभात’च्या दामले यांचे पणतू अनिल दामले म्हणाले,‘संत ज्ञानेश्वर चित्रपटाचा १८ मे रोजी अमृत महोत्सव आहे. त्या काळात टाइम्स ऑफ इंडियाने ‘संत ज्ञानेश्वर’वर खास पुरवणी काढली होती. अमेरिकेत व्यावसायिक प्रदर्शन करण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. तत्कालीन अमेरिकन श्रेष्ठ दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी ‘सिनेमेटोग्राफ’ या प्रख्यात सिने नियतकालिकात तेव्हा संत ज्ञानेश्वर चित्रपटाची प्रशंसा करणारा लेख ज्ञानदेव लाइट ऑफ एशिया लिहिला होता. प्रभातचा तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे संत ज्ञानेश्वर असे म्हटले जाते.’
संत ज्ञानेश्वर चित्रपटाची वैशिष्ट्ये
>चांगदेवाची भूमिका करणारे गणपतराव तांबट खऱ्या वाघावर स्वार झाले होते
>छोट्या ज्ञानेश्वरच्या भूमिकेसाठी यशवंत निकम यांची निवड झाल्यावर त्यांचीच भावंडे चित्रपटातही ज्ञानदेवांची भावंडे बनली
>चित्रपटाची पुण्यातली प्रत टाळ-मृदंग-वीणेच्या घोषात वाजत गाजत अभंग ओव्यांच्या गजरात चित्रपटगृहात आणली गेली होती.
>प्रल्हाद दत्त यांनी केलेल्या स्पेशल इफेक्ट्सचा बोलबाला विदेशातही पसरला होता.
>नेवासा, पैठण, आळंदीची स्केचेस बनवून त्यानुसार सेट बनवण्यात आले होते
>मोठ्या ज्ञानदेवांची भूमिका करणारे शाहू मोडक सात्त्विक दिसण्यासाठी उपवास करत. या चित्रपटानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले
>करुण, अद््भुत, वीर आणि शांत रसाची उत्कट अनुभूती
>मुंबई दूरदर्शनवरील मराठी चित्रपटांच्या प्रक्षेपणाचा शुभारंभ ऑक्टोबर १९७२ रोजी संत ज्ञानेश्वर चित्रपटाने झाला होता.
>‘प्रभात फिल्म कंपनी’चे सामाजिक दायित्व सांगणारे (१९३६) संत तुकाराम (१९३८) गोपालकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर (१९४०) हे चित्रपट पाठोपाठ प्रदर्शित झाले होते.
बातम्या आणखी आहेत...