Home »Maharashtra »Pune» Gyaneshwar Mauli Palakhi Change To Road At Pune

ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीमार्गात बदल

प्रतिनिधी | May 19, 2012, 07:08 AM IST

  • ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीमार्गात बदल

पुणे: आषाढी वारीसाठी दरवर्षी होणारा पालखी सोहळा हा पुणे, सातारा आणि सोलापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीची मांदियाळी असतो. त्यातही पुण्यात संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू तुकोबा यांच्या पालख्या एकाच वेळी मुक्कामाला असतात. दोन्ही पालख्यांचे स्वागतही एकाच वेळी मुंबई-पुणे रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने केले जाते. यंदा मात्र प्रथमच ज्ञानेश्वर माउलींची पालखी वेगळ्या मार्गाने नेण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने घेण्यात आल्याने पालख्यांच्या स्वागताचा सोहळा नेमका कुठे करायचा याविषयी मनपा संभ्रमात सापडली आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी दरवर्षी आळंदी, दिघी, विर्शांतवाडी, मुळा रस्त्याने मुंबई-पुणे रस्त्यावरील कमलनयन बजाज चौकात येते. त्याच सुमारास पिंपरी-चिंचवड-निगडीच्या दिशेने तुकोबांची पालखीही येते आणि वाकडेवाडीजवळ दोन्ही पालख्यांचे मनपाच्या वतीने स्वागत करण्याचा प्रघात आहे. या वर्षी ज्ञानेश्वर माउलींची पालखी होळकर पुलाऐवजी संगमवाडीमार्गे पुण्यात प्रवेश करेल. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे वाकडेवाडीऐवजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ दोन्ही पालख्यांच्या स्वागताचा एक पर्याय मनपासाठी खुला आहे.
पदाधिकारी रविवारी आळंदीत
पालखीचा मार्ग बदलण्याबाबत निर्णय घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली मनपामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौरांच्या नेतृत्वाखाली देवस्थानचे विश्वस्त आणि मानकरी यांची भेट घेऊन स्वागताचे ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार रविवारी हे पदाधिकारी आळंदी येथे जाणार आहेत. दरम्यान, पालखीमार्गाची दुरुस्ती, अन्य सुविधा, टॅँकरची सोय, फिरती स्वच्छतागृहे पावसाळी गटारांची सफाई या विषयांवरही चर्चा झाली.

Next Article

Recommended