आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - गारपीट सुरूच असल्याने राज्यातील नुकसानग्रस्त शेतीक्षेत्रात आणखी वाढ होणार आहे. नुकसानग्रस्त शेतीची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. गारपीटग्रस्तांना नियमानुसार हेक्टरी पाच ते बारा हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकेल.
राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधील 5 लाख 80 हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचे आणि डाळिंब, केळी, संत्रे, पपई आणि द्राक्ष या फळपिकांची प्रामुख्याने हानी झाली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असेही दांगट म्हणाले. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना मदत करताना आचारसंहितेचा अडसर येणार नसल्याचे मुख्ममंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अशी मिळेल मदत
नुकसान झालेल्या फळबागांना हेक्टरी बारा हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. रब्बी पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंतची मदत मिळते. केळी, पपई यासारख्या अल्पकालीन फळपिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.
नाशकात गारांसह मुसळधार पाऊस
जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपीट सुरू असल्याने शेतकरी हवालदिल असतानाच गुरुवारी शहरातही गारांसह पाऊस झाला. निफाड, चांदवड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यात सुमारे 6 हजार 853 हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झाले. त्यामुळे 10 हजार मेट्रिक टन उत्पादन असलेल्या बेदाणा उद्योगाला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. बेदाण्याचा रंग लाल होतो, तर वाळवण्यासाठी उशीर होत असल्याने दरावरही परिणाम होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.