आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm News In Marathi, Maharashtra, Meterology Expert

राज्यात दोन दिवस आणखी गारपिटीचा धोका, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्याच्या 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्याने शेतकरीवर्गावर जणू आभाळच कोसळले आहे. आणखी दोन दिवस या संकटाची भीती महाराष्ट्रात कायम असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


राज्य कृषी विभागाचे सांख्यिकी प्रमुख अनिल बनसोडे यांनी सांगितले की, फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. गेल्या दोन दिवसांतील गारपिटीची तीव्रता पाहता या क्षेत्रात दुपटीहून अधिक वाढ होण्याची भीती आहे. कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाकडून नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.


ग्लोबल कूलिंगचा परिणाम
हवामानातील हे टोकाचे बदल घडण्यामागची कारणे भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी विशद केली. ‘ग्लोबल कूलिंगमुळे तापमानात सरासरी 0.5 ते 0.65 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. परिणामी हवेतले बाष्प ढगांमध्ये मोठय़ा प्रमाणात बर्फात रूपांतरित होत आहे. दिवसा गरम व रात्री थंड असा फरक तापमानात पडल्याने हवामानाची अस्थिरता वाढली आहे. ग्लोबल कूलिंगची उदाहरणे जागतिक स्तरावरसुद्धा अनुभवण्यास मिळाली आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका-कॅनडाच्या किनार्‍यावरचा नायगरासुद्धा गोठल्याचे जगाने यंदाच्या हिवाळ्यात पाहिले.


मराठवाड्यात मोठे नुकसान
दोन वर्षांच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर यंदाचे वर्ष दमदार पावसाचे ठरले. त्यानंतर राज्यात हिवाळाही चांगला जाणवला. किमान तापमान दोन अंशांपर्यंत गेल्याची ठिकाणे राज्यात पाहण्यास मिळाली. त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यापासून दिवसाच्या तापमानात वाढ आणि रात्री थंडी असे विचित्र हवामान अवतरले. मार्चची सुरवात मात्र गारपिटीने झाली. यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान सुरू आहे. सोलापूर, औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. नगर जिल्हय़ातील पाथर्डी तालुक्यात अंदाजे 15 कोटींचे नुकसान झाले.


औरंगाबादेत 83 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट
सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाचा औरंगाबाद जिल्हय़ालाही मोठा फटका बसला. पैठण, वैजापूर, सोयगाव, सिल्लोड, खुलताबादसह कन्नड तालुक्यांतील 83 हजार हेक्टरवरील ज्वारी, गहू पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले.


पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरात सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाची नोंद 9 मिलिमीटर इतकी झाली. वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात शेकडो हेक्टरवरील गहू भुईसपाट झाला. पावसासह गारपीट झाल्याने हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. सिल्लोड शहरासह भराडी, अन्वी, गोळेगाव, उंडणगाव, पानवडोद आदी भागात जोरदार पाऊस झाला. शिवना परिसरात सलग तिसर्‍यांदा झालेल्या अवकाळी पावसाने गव्हाचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार राहुल गायकवाड व कृषी अधिकारी सुभाष आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी मंडळ अधिकारी एस. पंडित, कृषी सहायक एस. एन. फुसे यांनी पंचनामे केले.


डाळिंबाचे प्रचंड नुकसान
नांदर येथे सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली तर डाळिंब, मोसंबी, गहू, ज्वारीचे मोठे नुकसान झाले. सध्या नांदर, दावरवाडी, कुतुबखेडा, सालवडगाव, नानेगाव, हर्षी, दादेगाव परिसरात ज्वारीचे खळे, सोंगणी सुरू असून यासदेखील गारपिटीचा फटका बसला. नांदरगाव हे प्रामुख्याने डाळिंबाचे पीक घेणारे असल्याने पावसाने डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले.