आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन ठेवा: आळंदीची हस्तलिखिते प्रकाशकांच्या प्रतीक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सातशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीचे, ज्ञानेश्वरांच्या आळंदीचे तसेच पवित्र परिसराचे माहात्म्य सांगणारी मराठी व संस्कृत भाषेतील चार महत्त्वपूर्ण हस्तलिखिते प्रकाशकांच्या प्रतीक्षेत आहेत. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी विश्वस्त आणि मराठी हस्तलिखित केंद्राचे संचालक वा. ल. मंजूळ यांनी या दुर्लक्षित हस्तलिखितांविषयी माहिती दिली. ही चारही हस्तलिखिते उत्तमरीत्या जतन केलेली असून त्यांचे संकलन करून ती प्रकाशित होण्याची गरज आहे. यासाठी एखादी प्रकाशन संस्था पुढे आल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी असल्याचे मंजूळ यांनी सांगितले आहे.

स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात आळंदीचा उल्लेख संस्कृतमध्ये ‘अलकापुरी’ असा आढळतो. १८५६ मध्ये अप्पा वैद्य यांनी लिहिलेल्या हस्तलिखितात आळंदीचे वर्णन संक्षिप्त स्वरूपात आहे. सध्या हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळात पोथी स्वरूपात आहे. ‘अलका माहात्म्य’ या अन्य एका हस्तलिखितात आळंदीचा उल्लेख आनंदवन-अलकावती-अलका असा येतो. इंद्रायणीचा उल्लेख ‘कौबेरस्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा येतो. आळंदी माहात्म्य कथन करणारे तिसरे हस्तलिखित ‘ज्ञानलीलामृत’ कवी सदाशिव यांचे आहे. हा मराठीतील ओवीबद्ध ग्रंथ आहे. ‘बापरखुमादेवीवरू’ या मासिकात तो क्रमश: प्रसिद्ध झाल्याची नोंद आहे; पण संकलित ग्रंथरूप मात्र नाही.

दोनशे वर्षांपूर्वीचा कवी सदानंद कुलकर्णी लिखित ‘आमची आळंदी’ हे हस्तलिखित ओवीबद्ध आहे. याची हस्तलिखित प्रत ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे.

आळंदीचे विदेशी अभ्यासक
आळंदीचे माहात्म्य सांगणा-या या हस्तलिखितांचा अभ्यास विदेशी अभ्यासकांनी मात्र आवर्जून केला आहे. रशियन संशोधक डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी अप्पा वैद्य लिखित हस्तलिखिताचा अभ्यास करून मॉस्को ओरिएंटल संस्थेत प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.

दुर्लक्षित असलेली हस्तलिखिते
अप्पा वैद्य लिखित ११ पृष्ठांचे हस्तलिखित, १२३ श्लोक
संतकवी बालमुकुंद केसरी लिखित अलका माहात्म्य, ४६ पृष्ठे, श्लोक १३३, १६ वे शतक
कवी सदाशिव लिखित ज्ञानलीलामृत, मराठी लेखन
कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी लिखित आमची आळंदी, ओवीबद्ध १८ अध्याय, २०० ओव्या