आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य संमेलनस्थळाची वाट सारस्वतांसाठी ‘बिकट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या सासवडनगरीत येत्या 3 जानेवारीपासून रंगणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कर्‍हा नदीच्या काठावर संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी आयोजकांनी कंबर कसली असली, तरी संमेलनस्थळ गाठेपर्यंत सारस्वतांचे कंबरडे मोडण्याची चिन्हे आहेत.
पुण्याच्या पूर्वेला दहा मैलांवर दिवे घाटाची चढण आहे. घाट ओलांडल्यानंतर 7 मैलांवर सासवड येते. पुण्यातल्या ‘ट्रॅफिक’मधून वाट काढत घाट पार केल्यावरही ‘यातायात’ संपत नाही. घाटापासून पुढच्या रस्त्यावर माती-खडीचे ढीग, खड्डय़ांच्या माळा आणि ‘सावधान : काम चालू’चे फलक जागोजागी आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक आणि गर्दीशी होणारा सामना अटळ आहे. जेजुरीच्या दिशेने सासवड गाठायचा प्रयत्न केला तरीही ही ‘दिव्ये’ चुकत नाहीत. आचार्य अत्रे यांच्या ‘कर्‍हेचे पाणी’ या आत्मचरित्रातील टुमदार, रमणीय सासवडच्या बहारदार आठवणी मनात घोळवत आलात तर तुमची फसगत होईल हे नक्की.
नावे देण्याची काळजी
संत ज्ञानेश्वरांच्या पालखी तळावर तीन दिवसांचा साहित्य सोहळा होणार आहे. यासाठी अकरा हजार र्शोते मावतील एवढा चाळीस हजार चौरस फुटांचा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलाय. संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांनी सासवड (जुन्या काळचे संवत्सर) येथे समाधी घेतली. त्यामुळेच संमेलनस्थळाचे नामकरण ‘र्शी संत सोपानदेवनगरी केले आहे. नावांवरून वादंग माजणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. किल्ले पुरंदर हे जन्मस्थळ असलेल्या संभाजीराजेंच्या नावाने ‘छत्रपती संभाजीराजे ग्रंथनगरी’ उभारण्यात आलीय. मुख्य व्यासपीठाला ‘आचार्य अत्रे’ यांचे नाव देण्यात आले आहे.
पंधरा हजारांसाठी पक्वान्ने
साहित्यिक मेजवानीबरोबरच पोटोबाचीही पुरेपूर काळजी संमेलनात घेतली जाणार आहे. संमेलनस्थळी दररोज पाच हजार जणांच्या जेवणावळी उठणार आहेत. पहिल्या दिवशी सीताफळ बासुंदी, गुलाबजाम, दुसर्‍या दिवशी बालुशाही, गाजराचा हलवा तर समारोपाला र्शीखंड, बासुंदी अशी पक्वान्ने आहेत. याशिवाय अनेक रुचकर पदार्थांची रेलचेल असेल.