आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हर्षवर्धन पाटील यांचा आणखी एक पराभव, ‘राष्ट्रवादी’ने हिसकावली इंदापूर बाजार समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - १९९५ ते २०१४ पर्यंत सलग मंत्रिपद भूषवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक धक्का दिला आहे. काँग्रेसच्या ताब्यात असणारी इंदापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती जिंकली आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातली ही पहिलीच निवडणूक पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र ‘राष्ट्रवादी’ने बाजार समितीतील १९ पैकी १६ जागा जिंकून हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. इंदापूर बाजार समिती निवडणूक प्रचारादरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात मोठी शाब्दिक ‘चकमक’ उडाली होती. माजी खासदार शंकरराव पाटील यांनी उभारलेल्या इंदापुरातील सहकारी संस्थांवर हर्षवर्धन पाटील गेली दोन दशके मांड ठोकून होते. त्यास ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी जोरदार आव्हान दिले आहे. आमदारकी गमावल्यानंतर हर्षवर्धन यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरील सत्ता टिकवून ठेवली होती. या वेळी मात्र हातची बाजार समिती त्यांना गमावावी लागली.

‘राष्ट्रवादी’चे आमदार दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी या निवडणुकीत काँग्रेसविराेधात मोर्चेबांधणी केली होती. अजित पवार त्यावर जातीने लक्ष ठेवून होते. हर्षवर्धन यांच्या काँग्रेसप्रणीत कर्मयोगी शंकरराव पाटील शेतकरी विकास पॅनलविरोधात ‘राष्ट्रवादी’च्या शेतकरी विकास पॅनलने दंड थोपटले होते. चुरशीच्या निवडणुकीत ९८ टक्के मतदान झाले होते. मात्र साेमवारी मतमाेजणीनंतर निकाल बाहेर अाले तेव्हा काँग्रेसच्या पॅनलचा पराभव झाला.

दाैंडमध्येही राष्ट्रवादीच
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांनी आमदार राहुल कुल यांना अस्मान दाखवले. कुल हे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आहेत. दौंडमध्ये ‘राष्ट्रवादी’प्रणीत पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्या.

बारामतीत विरोधी पॅनलचा धुव्वा
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत या वेळी विराेधकांनी पॅनल उभे करून ‘राष्ट्रवादी’ला अाव्हान दिले हाेते. मात्र, निवडणुकीअाधीच राष्ट्रवादीने सहा जागा बिनविरोध निवडून आणत आघाडी घेतली हाेते. उर्वरित १३ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर ‘राष्ट्रवादी’ने विरोधकांना गारद करत सर्वच सर्व १९ जागा जिंकल्या. गेल्या तीन दशकांपासून बारामतीची बाजार समिती पवारांच्या ताब्यात आहे. या वेळी सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’ने रयत पॅनल उभे केले होते. सोमवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच रयत पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. विरोधकांपेक्षा तिप्पट मते जास्त घेत ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार विजयी झाले.
बातम्या आणखी आहेत...