आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पवारां’च्या रडारवर हर्षवर्धन पाटील; काका, पुतणे, मुलीने लावला इंदापुरात सभांचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पवार कुटुंबीयांच्या रडारवर आहेत. बारामतीलगतच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील हे १९९५ पासून सलग निवडून येत आहेत. या वेळी मात्र त्यांना पाडण्यासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यापाठोपाठ स्वतः शरद पवारदेखील आता प्रचाराच्या अखेरच्या दिवशी इंदापुरात दोन सभा घेणार आहेत.

अजित पवारांपेक्षा जास्त काळ राज्याच्या मंत्रिपदी राहिलेले हर्षवर्धन आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गेल्या चारही निवडणुकांत अजित पवारांनी हर्षवर्धन यांच्या पराभवासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, हर्षवर्धन यांनी प्रत्येक वेळी त्यांच्यावर मात केली. या वेळी काँग्रेससोबतची मैत्री तुटल्यानंतर पवार कुटुंबीयांनी जाहीरपणे हर्षवर्धन यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.

काँग्रेसबरोबर मैत्री असूनही गेल्या चारही निवडणुकांत अजितदादांनी हर्षवर्धन यांच्याविरोधात उमेदवार उभे केले. मात्र, प्रत्येक वेळी प्रचाराच्या शेवटी शरद पवार यांची सभा इंदापूर तालुक्यात व्हावी यासाठी हर्षवर्धन प्रयत्न करत. २००९ मध्येही शरद पवारांचे मित्र काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांची मध्यस्थी करून पवारांना इंदापुरात सभा घ्यायला लावण्यात हर्षवर्धन यशस्वी झाले होते. पवारांच्या प्रचारसभेमुळे हर्षवर्धन निसटता विजय मिळवू शकले होते. अजित पवार यांचे समर्थक दत्तात्रय भरणे यंदा राष्ट्रवादीकडून लढत आहेत. इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात असल्याने आतापर्यंत सुप्रिया सुळेदेखील ‘हर्षाभाऊ’ असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी जात. या वेळी सुप्रिया यांनी ‘कारभारी बदला’ असे आवाहन इंदापुरात केले. ‘इंदापूरने दिलेल्या मताधिक्यामुळेच तुम्ही खासदार झालात याची जाणीव ठेवा,’असे जोरदार प्रत्युत्तर यानंतर काँग्रेसकडून सुळे यांना देण्यात आले. अजित पवारांनीही इंदापुरात प्रचारसभा घेत हर्षवर्धन यांच्यावरचा राग मोकळा केला. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शरद पवारांचा ‘पाटील’ विरोध पारंपरिक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासदार शंकर बाजीराव पाटील आणि शरद पवार यांच्यात कधीच सख्य नव्हते. शंकर पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, शरद पवारांनी त्यांना तिकीट मिळणार नाही याचा बंदोबस्त केला. त्यावर हर्षवर्धन यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. एवढेच नव्हे तर गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे ते युती सरकारमध्ये मंत्रीही झाले. १९९९ मध्येही हर्षवर्धन यांनी अपक्ष म्हणूनच इंदापूर दुस-यांदा जिंकले. या वेळी विलासराव देशमुखांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. त्यावर अजित पवारांनी प्रचंड थयथयाट केल्याने अवघ्या अडीच महिन्यांतच हर्षवर्धन यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, लवकरच ‘शेकाप’च्या गणपतराव देशमुखांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि विलासरावांनी पुन्हा हर्षवर्धन यांना मंत्रिमंडळात घेतले. जवळपास १९ वर्षे मंत्री असलेले हर्षवर्धन "मंत्रिमंडळात मी अजित पवारांना सीनियर आहेत,’ असे गमतीने म्हणतात तेव्हाही अजितदादा संतापतात.