पुणे - यंदाच्या हिवाळ्यातील पहिली थंडीची लाट (कोल्ड वेव्ह) डिसेंबरच्या तिस-या आठवड्यात महाराष्ट्रात अवतरली असून संपूर्ण राज्यच कडाक्याच्या थंडीने गारठून गेले आहे. विदर्भात थंडीचा कडाका सर्वाधिक असून यवतमाळ येथे ६.२ अंश सेल्सियस इतक्या राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही पारा आठ अंशांपर्यंत घसरला आहे. पाऊस, गारपीट आणि ढगाळ हवामानामुळे नोव्हेंबरचा पूर्ण महिना आणि निम्मा डिसेंबर उलटल्यानंतरही थंडीचे आगमन झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचे आगमन झाले होते.
उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांनी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून पुढचे दोन दिवस राज्यात थंडी टिकून राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
विदर्भ थंड
उन्हाळ्यात सर्वाधिक तापणारा विदर्भ थंडीच्या लाटेत सर्वात थंड पडला आहे. यवतमाळ येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीच; शिवाय गोंदिया, नागपूर येथेही प्रत्येकी ६.८ अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात ७.५ अंशांपर्यंत तापमान घसरले. विदर्भात बहुतेक ठिकाणी पारा दहा अंशांच्या खाली होता.
काेकण उबदार
पुढच्या दोन दिवसांत राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा कमी असेल. दिवसाच्या तापमानातही सरासरीपेक्षा घट होण्याची चिन्हे असल्याने थंडीचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी जास्त असेल. तुलनेने कोकण किनारपट्टीत वातावरण उबदार असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
घसरलेला पारा
गेल्या २४ तासांतील राज्यातील काही शहरांमधील नीचांकी तापमान अंश सेल्सियसमध्ये :
मुंबई २१.२,
पुणे ९.१,
नगर८.१,
जळगाव८.४,
मालेगाव ८.५
नाशिक ७,
उस्मानाबाद ८.४,
औरंगाबाद ९.८,
नांदेड १०,
वर्धा ८.८,
बुलडाणा ९.२.