पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रूग्णालयाला आज सकाळी 10 च्या सुमारास भीषण आग लागली. वायसीएम रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील रूबी अलकेअर युनिटमध्ये ही आग लागली आहे. हा विभाग महापालिकेच्यामार्फत खासगी तत्त्वावर रूबी रूग्णालयाला चालवायला दिला आहे. या विभागाचे व्यवस्थापन रूबी रूग्णालय पाहते.
आज सकाळी 10 च्या सुमारास या विभागात अचानक धूर येऊ लागला. कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे आग लागल्याचे दिसून आले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, रूग्णालयात हजारो पेशंट असून, त्या सर्वांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे वायसीएम रूग्णालयाची सेवा आज विस्कळित झाली आहे. आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.